पुणे : कर्णकर्कश डिजेविरोधामध्ये आता पुणेकर मोठ्या प्रमाणामध्ये एकवटले असून ‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच’ या नावाने सोशल मीडियावर मोठा ग्रुप तयार झाला असून त्यांच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना लेखी निवेदन देण्यात आले व विविध बाबींबाबत चर्चा करण्यात आली.केवळ गणेश उत्सव नाही तर इतर सर्वच पद्धतीच्या धार्मिक, जातीय,राजकीय मिरवणुका मध्ये कर्णकर्कश लाऊडस्पीकरवर बंदी आणावी ही मागणी करण्यात आली असून यासंदर्भात -
१)उत्सवानंतर कारवाई करण्याऐवजी कार्यक्रमापूर्वी प्रतिबंध केला जावा आणि त्यासाठी अनाधिकृत स्पीकर्स व जनरेटर सेट याची तपासणी केली जावी.
२)तसेच चार टॉप आणि चार बेस या पद्धतीला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याने प्रत्यक्षामध्ये वॅट पॉवर वर आधारित आणि डिसिबल मोजणीचा आधार घेत यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. ३)याशिवाय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अधिकृत सरकारी पोर्टलवर शहरातील विविध ठिकाणच्या रियल टाईम म्हणजे थेट ध्वनी डेसिबल पातळीची नोंद होऊन ती वेबसाईटवर जाहीर केली जावी.
४) प्रभागात त्यात्या ठिकाणची संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची यादी फोन नंबर हे जाहीर करण्यात यावी.
५) कुठल्याही पद्धतीचे नागरिकाचे शारीरिक अथवा मानसिक नुकसान झाल्यास त्यास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्ड अथवा पुणे महानगरपालिकेने करायला हवी अशी मागणी करण्यात आली.
६) या संदर्भात पोलिसांनी केलेल्या कारवाईचे दैनंदिन वृत्तांत जाहीर केले जावे अशी मागणी यावेळेस करण्यात आली.
७)याबाबत या लाऊडस्पिकरविरोधी पुणेकर मंचातर्फे विविध ठिकाणी डेसिबल मोजणी केली जाणार असून त्याची ऑनलाईन नोंद सोशल मीडियावर ठेवली जाईल.
कायद्याच्या चौकटीत राहून या सर्व गोष्टी यापूर्वीच पोलिस आयुक्त ,महापालिका आयुक्त आणि पुण्याचे प्रथम नागरिक यांनी एकत्रितपणे करायला हव्या होत्या. दहीहंडी मधील पोलिसांची कामगिरी हि लिटमस टेस्ट असणार आहे.
इतर शहरात पोलीस आयुक्त या संदर्भात प्रतिबंध जाहीर करीत आहेत. सोलापूरला जर परंपरेचे भान राखले जाते नागपुरात कायद्याचा मान राखला जातो तर पुण्यामध्ये का मोकळे रान? लाऊडस्पीकरमुक्तीमध्ये नागपूर,सोलापूरला जमलं मग पुण्यात कुठे अडलं? असा सवाल यावेळी करण्यात आला. मुकुंद किर्दत तसेच एडवोकेट कुणाल घारे, डॉक्टर सिमी आठवले, चिंतामणी कांगो, श्रीकांत भिसे, सुदर्शन जगदाळे आदी यावेळेस उपस्थित होते.
महत्वाचे मुद्दे :
कर्णकर्कश डीजे लाऊडस्पीकरवर बंदीसाठी ' पुणेकर अगेन्स्ट लाऊडस्पिकर' (लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंच ) मंचातर्फे बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळा ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा रविवारी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे.