सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इम्रान खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! ‘नोकरीच्या शोधात आहे’ म्हणताच कोर्टाने सुनावले खडेबोल; देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती कायम
  • महाराष्ट्रातील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी! पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टासह अनेक जिल्हा न्यायालये रिकामी; पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर
  • शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौरा रद्द
  • पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
  • राज्यात दुष्काळाच्या संकटात वरुणराजाची एन्ट्री! पुणे, बारामती, इंदापुरात काल रात्रीपासून अवकाळी पावसाचा हाहाकार
 विश्लेषण

दिवाळीसाठी नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे मार्गावर विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन

डिजिटल पुणे    29-10-2026 18:58:41

बुलढाणा : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुकर व्हावा, यासाठी नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे (हडपसर) या मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याच्या मागणीला यश आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या मागणीच्या अनुषंगाने रेल्वे विभागाने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. याबाबतची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्राद्वारे दिली आहे.

दिवाळीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे विभागाने दोन्ही प्रमुख मार्गांवर विशेष गाड्या तसेच अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर ८ विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, आणखी ८ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन आहे. तर नागपूर-पुणे (हडपसर) मार्गावर १७ विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, अतिरिक्त २४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे.

याशिवाय शेगाव, नाशिक, अमरावती, विशाखापट्टणम, विजयवाडा आणि उधना या मार्गांवरही १८ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. याव्यतिरिक्त आणखी १३ रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पत्रात देण्यात आली आहे.

दिवाळीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता विशेष रेल्वे गाड्या आणि अतिरिक्त फेऱ्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती