आम्ही जातो आपुल्या गावा । आमचा राम राम घ्यावा ।।
तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी ।।
आतां असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ।।
येतां निजधामीं कोणी । विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ।।
रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला ।।
भगवद्भक्तीची पताका खांद्यावर घेऊन आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले. तुकोबांचे अभंग वाचणारा प्रत्येकजण या वादळाने झपाटला जातो. सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला स्पर्श करणारी अशी तुकोबांची लोकोत्तर प्रतिभा आहे.
तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदार्थ तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. संत तुकारामांचे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने तुकोबा स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. तुकोबांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.
खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत. संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे.
भागवत धर्माचा कळस ठरलेल्या संत तुकारामांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म-कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला. संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म, भागवत भक्ती, उपदेशाची कास न सोडणाऱ्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना विनम्र अभिवादन