"व्यवस्थापन ताण तणावाचे"
महिला वर्ग आणि ताण तणाव या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाहीच! सध्याच्या युगात ताण तणाव हा जवळपास सर्वच महिलांच्या आयुष्याचा जणू भागच बनून गेला आहे! मग त्या महिला नोकरदार असो वा गृहिणी !!!
यावर्षी आयोजकांनी एक मस्त विषय घेतला आहे... विषय बघून मनमोकळे करण्यासाठी का होईना चला जे काही अनुभवले त्याला शब्दांत उतरविण्याचे ठरवून लेख लिहिण्याचे मनाशी नक्की केले.... स्पर्धा वैगेरे काय त्या तर नेहमी होतच असतात... चांगले जेवण बनवण्यासाठी आणि संसार सुखाचा करण्यासाठी घरच्यांशी, आम्हीच कुटुंब म्हणून सर्वगुण संपन्न अशी स्पर्धा शेजाऱ्यांशी, आमचे सर्व काही ठीक सुरु आहे हे दाखविण्याची स्पर्धा मित्र परिवाराशी... वगैरे वगैरे... चला विषयांतर होण्या अगोदर मस्त अशा मुख्य विषय 'ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करायचे?" याकडे वळूया ...!
ताण तणाव हाताळण्यासाठी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर पूर्ण विश्वास असणे! पहिले, आपण जे काही करतो आहे त्याची जबाबदारी स्वतः घेऊन ते व्यवस्थित च होईल याची काळजी घेतली की ते काम खात्रीशीर पणे चांगलेच होते आणि एकदा का हाती घेतलेले काम योग्य तऱ्हेने झाले की मग कोणाचे बोलणे ऐकून घ्यावे लागत नाही! आणि अती आवश्यक असा "आत्मविश्वास' निर्माण होतो.... मग ते काम - नोकरी चे असो, घर संसार असो अथवा सामाजिक दृष्ट्या काही काम असो... स्वतः वरती विश्वास असल्यास नकळत उद्भवणारा "ताण तणाव" नक्कीच जाणवत नाही वा जाणवलाच तर कमी प्रमाणात.....
प्रथमतः आपण 'ताण तणाव निर्माण होण्याची मुख्य कारणे कोणती हे पाहिले तर नोकरी, घर संसार, समाज अशा तिहेरी भूमिका निभावताना स्वतःकडे लक्ष देण्यास आवश्यक तो वेळ न मिळणे... नोकरदार महिला असल्यास वेळेचे बंधन, सहकाऱ्यांचे टोमणे, बॉस चे बोलणे/दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याचे ध्येय, समाजाच्या चाली रिती सांभाळत स्वतःचा पेहराव अनुसरणे, रात्री अपरात्रीची वेळ असल्यास असुरक्षिततेची काळजी लागणे आणि गृहिणी महिला असल्यास मुला बाळांची काळजी, त्यांची उठाठेव / शाळा / गृहपाठ, नवऱ्याचा डबा / कपडे इत्यादी, सासू सासरे सोबत राहत असल्यास त्यांची काळजी घेणे / दवाखाना करणे, सध्या जागे अभावी कुटुंब मोठे असूनही एकत्र राहणे शक्य होत नसल्याने कुटुंबातील सदस्य इतरत्र असूनही आपण एक कुटुंब म्हणून कसे एक राहू याचा विचार करणे अशा एक ना अनेक गोष्टी होणाऱ्या ताण तणावास कारणीभूत ठरत असतात...!
मग, या न मागता येणाऱ्या ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करायचे? तर ते असे आपल्या धर्मामध्ये एक प्रचलित म्हण आहे "अतिथी देवो भवः" या ताण तणावा ला आपण अतिथी च समजायचे.... अतिथी म्हणजेच पाहुणा जो न सांगता कधीही येतो तसेच ताण तणाव ही काही सांगून येत नाही आणि जरी आला तरी तो काय कायम नक्कीच राहणार नाही... पाहुण्यासारखा काही दिवसांत नक्कीच परत जाणार... फक्त तो जेवढा वेळ आपल्या सोबत असेल तेवढा वेळ विश्वासाने त्याचा सामना करण्याची मनापासून तयारी ठेवायची! आणि तो विश्वास आपल्याला आपल्या धर्माने आयताच उपलब्ध करून दिलेला आहे...
प्राणायाम, ध्यान धारणा, नित्य पूजा अर्चा, सत्संग, व्यायाम इत्यादी अनेक मार्ग ताण तणाव दूर करण्यासाठी फार उपयुक्त ठरत पण, घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अशा महत्वाच्या विषयांकडे काना डोळा होत असतो..! तेव्हा आपण ताण तणावाला बळी पडू नये म्हणून आपल्या ऋषी मुनींनी हे हजारो वर्षांपूर्वी च कलियुगातील परिस्थिती चा अभ्यास करून आपल्यासाठी प्राणायाम, ध्यान धारणा, नित्य पूजा अर्चा, सत्संग, व्यायाम यांसारखे सन्मार्ग उपलब्ध करून ठेवले आहेत आणि या मार्गाचा अवलंब करून आपण ताण तणावापासून नक्कीच मुक्त होऊ शकतो... कित्येक सुशिक्षित, गर्भ श्रीमंत, कलाकार, राजकारणी लोक या मार्गाचा अवलंब करून निरोगी, तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगत आहेत त्याची उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर टिव्ही, वृत्तपत्रे, सोशल मीडिया यांसारख्या माध्यमातून आपल्याला मिळतच असतात.... हा झाला एक मार्ग...!
ताण तणावापासून लांब राहण्यासाठी दुसरा उत्तम मार्ग म्हणजे जे समोर येईल ते स्वीकारणे, अपेक्षा विरहित जीवन जगणे... आपण आपल्या अपेक्षा कमी केल्या की कोणत्याच प्रकारचे टेन्शन येत नाही। अपेक्षांचे ओझे डोक्यावर ठेवून चाललो आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर मग अतिरिक्त मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आणि त्यातून ताण तणाव वाढू लागतो. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, नेहमी पुरेशी विश्रांती घेणे, कंटाळा आलाच तर आपले आवडते छंद जोपासणे मग ते टिव्ही पाहणे असो, खाणे असो, फिरणे असो वा इतर काही.
ताण तणावाला आपल्या पासून दूर ठेवण्यासाठी तिसरा पर्याय म्हणजे सोशल मीडिया, मित्र परिवार। हे दोन असे व्यासपीठ आहेत जिथे आपण व्यक्त होऊ शकतो, दिलखुलास बोलू शकतो, जगात काय सुरु आहे, रिल्स, कॉमेडी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला व्हॉटसअप, फेसबूक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया स्थळांवरून सहज उपलब्ध होत असतात ज्याद्वारे आपला विरंगुळा आणि करमणूक होऊन आपण ताण तणावाला बाजूला करू शकतो!
तर, हे झाले माझ्या अनुभवावरून ताण तणावाचे व्यवस्थापन करण्याचे काही मार्ग...! आपल्या दैनंदीन जीवनात या सर्वांसाठी अवश्य वेळ काढणे ही काळाची गरज आहे. नाहीतर, आजार /हृदय विकार यांसारखे काळ टपून बसलेले आहेतच. तेव्हा प्राणायाम, ध्यान धारणा, नित्य पूजा अर्चा, सत्संग, व्यायाम, अपेक्षा विरहित जीवन जगणे, सोशल मीडिया, मित्र परिवार, नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे.... यांसारख्या मार्गांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवून त्यांना अवश्य वेळ घ्या आणि बघा ताण तणावाचे व्यवस्थापन किती उत्तम रित्या होते ते...! हे सर्व केले तर ताण तणाव आपल्या जवळपास ही फिरकू शकणार नाही हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून अगदी खात्री शीर पणे सांगू शकते... !
धन्यवाद!
सौ. ज्योत्स्ना गणेश जंगम, सदाशिव पेठ, पुणे.
८८०६९२४५७६