पुणे: अलीकडच्या काळात सातत्याने गुन्हेगारी घटनांचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील खराडी परिसरात घडलेली एक अत्यंत भीषण घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी आहे. पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या पित्याने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा गळा कापून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.घटनेने पुणेकरांच्या मनाचा ठोकाच चुकविला असून, पत्नीशी वाद झाल्यानंतर त्याने रागातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चंदन नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीशी भांडण झाल्यानंतर नवरा आपल्या मुलाला घेऊन घराबाहेर पडला. पण रात्री उशीरापर्यंत दोघे घरी आले नाहीत. त्यामुळे पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि ऑनलाईन पेमेंटच्या मदतीने मुलाच्या वडिलांना शोधून काढले आणि हा प्रकार समोर आला.
हिंमत माधव टीकेटी (३ वर्ष) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात वडिल माधव टीकेटी (वय ४०, रा. खराडी) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, टीकेटी कुटूंब मुळचे बाहेर राज्यातील आहे. नोकरी निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून पुण्यात स्थायिक आहे. माधवने बेंगलोरमधील प्रसिद्ध अश्या आयआयटीमधून एम.टेकचं शिक्षण घेतले आहे. तर, आईचे बी.टेकचे शिक्षण झालेले आहे. उच्चभ्रु दाम्पत्य वडगाव शेरी परिसरात राहत होते. त्यांना एक मुलगी व एक तीन वर्षाचे गोंडस मुलं होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास स्वरुपा टिकैती ही महिला चंदन नगर पोलीस ठाण्यात आली होती. तिने तिचा साडेतीन वर्षांचा मुलगा हिंमत टीकेटी हा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. सुरुवातीला पोलिसांनी चौकशी सुरु केली तेव्हा मुलाचे अपहरण झाल्याचा संशय होता. तेव्हा पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता मुलगा त्याच्या वडिलांबरोबर गेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर वडील एका लॉजवर जाऊन झोपले होते. पोलिसांनी या लॉजचा दरवाजा तोडून माधव टीकेटी याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता माधव टीकेटी याने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.
माधव टीकेटी याने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा गळा कापून त्याचा ठार मारले. माधव टीकेटी याने मुलाला ठार मारल्याची कबुली दिली आहे. त्याने मुलाचा मृतदेह जिथे टाकून दिला होता, ती जागाही पोलिसांना दाखवली. यानंतर पोलिसांनी मुलाच्या वडिलांविरोधात हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मात्र, प्राथमिक तपासात पती आणि पत्नी यांच्यातील भांडणातून माधव टीकेटी याने आपल्या चिमुकल्या मुलाचा खून केल्याचे समोर आले आहे. आता पोलीस चौकशीत याप्रकरणाचा आणखी तपशील समोर येईल.
