मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण उचलून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ‘सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखण्यात आला होता’, असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की,”सतीश भोसले हरणांना मारुन त्याचे मांस हे सुरेश धस यांना पुरवतो, असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना विमानाची तिकीटे काढून राजस्थानातून मुंबईत आणण्यात आले होते. या लोकांना मला मारण्यासाठी आणले होते”, असा दावा सुरेश धस यांनी मुलाखतीत केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “खोक्या जो वाळू कॉन्ट्रक्टर आहे, वनविभागाच्या जागेत राहत होता, बेनटेक्सचे दागिने घालून फिरत होता. तसेच, मुथुट फायनान्समधून आणलेले पैसे उधळत होता. त्याची ४ ते ५ लाखांचीही प्रॉपर्टी नसेल, हाच तो खोक्या जो टीव्हीवर दाखवण्यात आला. त्याच्या घरात वाघार बिघारचं मांस सापडलं असेल. पण तेच वनविभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांनी उचलून नेले. आता पारध्याच्या घरात थोडंच पंचांग वगैरे सापडणार आहे का?” अशी मिश्किल टिप्पणीही यावेळी आमदार धस यांनी केली.
तसेच “माझ्या आयुष्यात १६ वर्षे मी माळकरी राहिलेला माणूस आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे मी करतो. पण माझ्या आयुष्यात हरणाच्या मांसापर्यंत कधीच गेलो नाही. मी पशू-पक्ष्यांवर प्रेम करणारा माणूस आहे. मला काय माहिती त्यांच्या घरात काय सापडले? असे म्हणत धस यांनी विरोधकांचा खोक्याने मांस पुरवल्याचा दावा फेटाळून लावला. याबाबत मी इतक्या दिवस काहीच बोललो नव्हतो, मात्र हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आता सांगणार आहे”, असेही त्यांनी सांगितले.