मुंबई : आज लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे. यावर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चर्चा चालणार आहे. विधेयकाध्ये विरोधी पक्ष काँग्रेसने सुचवलेल्या सुधारणांमध्ये बदल केला न गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून केलेल्या टीकेला देखील राऊतांनी प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि शिवसेना शिकवू नये. भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना मिशा फुटला नव्हत्या, तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पिळ देत या देशात फिरत आहोत. त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व अजिबात शिकवू नये. किंबहुना वक्फ सुधारणा बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. वक्फ बिल संदर्भात जे बील आले आहे, त्यात सरकार काही बदल करू पाहत आहे. मात्र त्या बिलाला देशातील फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे या बिलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पूर्णपणे पाठिंबा नाही”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध काय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगू शकतील. ज्याप्रमाणे इतर सुधारणा बिल असतात त्याचप्रमाणे हे विधेयक आहे. या बिलाचा संबंध भविष्यात काही उद्योगपतींना या जमिनीवर कब्जा मिळावा त्यासाठी या बिलाचा स्पष्ट हेतू आहे. शिवसेना ही प्रोग्रेसिव्ह हिंदुत्ववादाचा विचार मांडणारी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कायम विज्ञानवादी विचार मांडला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे बगलबच्चे जी बांग देत आहेत तो निव्वळ मूर्खपणा आहे”, असेही ते म्हणाले. तसेच हिंदुत्त्व हे हिंदुत्त्वाच्या ठिकाणी आहे, असेही त्यांनी सांगितले.