मुंबई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी या महोत्सवाला उपस्थित रहावे अशी विनंती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी येथे भेट घेऊन विनंती केली असून त्यांच्या विनंतीला राज्यपाल यांनी संमती दर्शवून ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मध्ये आयोजित करण्यात येणारे लेझर शो, टेंट सिंटीचे आयोजन, विविध परिसंवाद, देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम याची माहिती त्यांनी राज्यपाल यांना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मे रोजी उद्घाटन होणार आहे. तसेच या उद्घाटनाप्रसंगी मंत्रिमंडळातील सदस्यही उपस्थित राहणार आहेत.राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई’ चरित्र ग्रंथ पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिला. दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांचे कार्य आजच्या पिढीला मार्गदर्शक असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.