पुणे – उंड्री परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीस अज्ञात वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी केले आणि अपघात स्थळी न थांबता वाहनचालक पळून गेला. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी अवघ्या १० तासांत तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
घटना कशी घडली?
सोमवार, दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६:३० ते ८:०० वाजण्याच्या सुमारास न्याती ईबोनी सोसायटीजवळ, उंड्री येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सुजितकुमार बसवंतप्रसाद सिंग (वय ४९, रा. हांडेवाडी रोड, उंड्री) यांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. घटनेची माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी तत्काळ जखमीला ससून रुग्णालयात हलविले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तपासाची दिशा आणि पोलिसांची कारवाई
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १०६, २८१, १०५ तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली.
घटनास्थळ आणि आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक ग्रे रंगाची टाटा नेक्सॉन गाडी संशयास्पद वाटली. त्यानंतर पोलिसांनी आरटीओ विभागाच्या मदतीने मागील दोन महिन्यांत नोंदणीकृत २५०० ग्रे रंगाच्या टाटा नेक्सॉन गाड्यांची माहिती गोळा केली. त्यावर तांत्रिक विश्लेषण करून एमएच १२ एक्सएच ५४३४ क्रमांकाच्या वाहनावर संशय घेतला.
पुढील तपासात आरोपी समीर गणेश कड (रा. कडनगर, होलेवस्ती चौक, उंड्री) याने अपघातानंतर गाडीच्या दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट्स काढून औताडेवाडी येथील निर्जनस्थळी लपविल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सदर वाहन जप्त केले आणि आरोपीला ताब्यात घेतले.
पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर करीत आहेत. काळेपडळ पोलिसांच्या त्वरित आणि प्रभावी तपासामुळे अवघ्या १० तासांत आरोपीला अटक होऊन न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.