सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • त्रिबंकेश्वर मंदीर अ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून जाहीर
 DIGITAL PUNE NEWS

डोनाल्ड ट्रम्प यांचा जगभरातील देशांना जोरदार धक्का,भारतासह अन्य देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ आकारण्याची घोषणा

डिजिटल पुणे    03-04-2025 10:52:30

अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यापासून जगाच्या डोकेदुखीत वाढ करणारे अनेक निर्णय घेतले आहेत. भारतासह अन्य देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ आकारण्याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांची ही घोषणा आता प्रत्यक्षात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारने गुरुवारी मध्यरात्री 2 वाजता लिबरेशन डे ची घोषणा करत जगभरातील देशांवर टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. यामध्ये भारतावर 26 टक्के तर चीनवर 34 टक्के टॅरिफ आकारण्यात येणार आहे.

टॅरिफच्या माध्यमातून विदेशांकडून अमेरिकेची लूट होत होती असे स्पष्ट करत विदेशी वाहनांवर 25 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. या निर्णयानंतर जगभरात व्यापार युद्ध भडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या निर्णयाचा फटका भारत, चीनसह युरोपीय देशांना बसणार आहे. या निर्णयानुसार चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादनांवर 34 टक्के तर युरोपीय संघाकडून येणाऱ्या वस्तूंवर 20 टक्के टॅरिफ आकारला जाणार आहे. तसेच भारतातून अमेरिकेत येणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादनांवर 26 टक्के टॅरिफ घेतले जाईल.

ब्रिटेनमध्ये लागू असणाऱ्या 20 टक्के व्हॅटवर डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार टीका केली. जगभरातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ घेतला जाईल. परंतु, काही देशांच्या बाबतीत टॅरिफ जास्त असेल. जपानमधून येणाऱ्या विविध वस्तू्ंवर 24 टक्के टॅरिफ लागू होईल असे ट्रम्प यांनी यावेळी सांगितले. या कराची संपूर्ण माहिती ट्रम्प यांनी दिली नाही मात्र अमेरिके बरोबर व्यापारात ज्या देशांकडून चुकीचा व्यवहार केला जात आहे त्यांच्यावर जशास तसा टॅक्स आकारण्याच्या आदेशावर मी सही करत असल्याचे त्यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ 10 टक्क्यांवरून 20 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. आता नव्या निर्णयानुसार यात आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे. अमेरिका आता चीनकडून तब्बल 34 टक्के टॅरिफ वसूल करणार आहे. चीनकडून व्यापाराच्या आडून जी चालाखी केली जात आहे त्यास आळा घालण्यासाठी ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. या निर्णयामुळे ट्रेड वॉरचा धोका वाढला आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे जगभरातच या युद्धाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या वादांमुळे जागतिक पुरवठा साखळी बाधित होण्याचीही भीती आहे. यामुळे वस्तूंच्या किंमतीत वाढ होऊन वैश्विक आर्थिक मंदीचे संकट निर्माण होऊ शकते. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ही स्थिती अतिशय धोकादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या दोन अर्थव्यवस्थांतील व्यापारात काही समस्या निर्माण झाल्या तर त्याचे विपरीत परिणाम अन्य देशांवर होऊ शकतात. कृषी व्यतिरिक्त मॅन्यूफॅक्टरिंग, टेक्नोलॉजी आणि ऑटोमोबाइल यांसारखे उद्योगही टॅरिफमुळे प्रभावित होऊ शकतात.

कोणत्या देशावर किती रेसिप्रोकल टॅरिफ

चीन 34 टक्के

युरोपीय यूनियन 20 टक्के

दक्षिण कोरिया 25 टक्के

भारत 26 टक्के

व्हिएतनाम 46 टक्के

तैवान 32 टक्के

जपान 24 टक्के

थायलंड 36 टक्के

स्वित्झर्लंड 31 टक्के

इंडोनेशिया 32 टक्के

मलेशिया 24 टक्के

कंबोडिया 49 टक्के

ब्रिटन 10 टक्के

दक्षिण आफ्रिका 30 टक्के

ब्राझील 10 टक्के

बांग्लादेश 37 टक्के

सिंगापूर 10 टक्के

इस्त्रायल 17 टक्के

फिलीपीन्स 17 टक्के

चिली 10 टक्के

ऑस्ट्रेलिया 10 टक्के

पाकिस्तान 29 टक्के

तुर्कस्तान 10 टक्के

श्रीलंका 44 टक्के

कोलंबिया 10 टक्के


 Give Feedback



 जाहिराती