सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • त्रिबंकेश्वर मंदीर अ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून जाहीर
 DIGITAL PUNE NEWS

अमेरिकेच्या टॅरिफ टॅक्सचा भारतावर काय होणार परिणाम; कोणकोणत्या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसणार ? काय महागण्याची शक्यता?

डिजिटल पुणे    03-04-2025 13:05:50

अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेने भारतावर 26 टक्के डिस्काऊंटेड रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. तसेच भारताशिवाय जगातील अन्य बड्या देशांवर सुद्धा मोठमोठे टॅरिफ टॅक्स लावण्यात आला आहे. यापूर्वी अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर कोणताही देश शुल्क आकारत होता. आता अमेरिकाही त्या देशांकडून तशाच प्रकारचा टॅक्स आकारणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतातील अनेक क्षेत्रांमध्ये नुकसान होऊ शकते. यामध्ये कृषी, औषधनिर्माण, रसायने, औषधे, वैद्यकीय उपकरणे, कापड, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो… वाढत्या टॅरिफ टॅक्स मुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत माल पाठवणे अधिक महाग होईल, ज्यामुळे त्यांची मागणी कमी होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे, अमेरिकेसोबत वाढत्या व्यापारी तणावामुळे भारतीय रुपया कमकुवत होऊ शकतो, ज्यामुळे आयात महाग होऊ शकते आणि महागाई वाढू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे वाढत्या व्यापार तणावामुळे, जागतिक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करणे टाळू शकतात, ज्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊ शकतो. आधीच जगातील इतर कंपन्यांनी भारतीय शेअर मार्केट मधील पैसे काढायला सुरुवात केल्याने शेअर बाजारात घसरला आहे.

या आयात शुल्कामुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करणे महागात पडू शकते. भारतीय उत्पादनांवर जास्त कर लादल्याने अमेरिकन ग्राहकांना महागड्या वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले जाऊ शकते. भारतातून कच्चा माल किंवा तयार उत्पादने आयात करणाऱ्या अनेक अमेरिकन कंपन्यांच्या किमतीही वाढू शकतात. मात्र तज्ज्ञांच्या मते भारत या संकटाला सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यासाठी काही रणनीती आखावी लागेल. तसेच इतर निर्यात बाजारपेठांकडेही लक्ष द्यावे लागेल. भारताला युरोप, आफ्रिका आणि आशियाई देशांसोबत व्यापार वाढविण्यावर भर द्यावा लागेल. तसेच देशांतर्गत उद्योगांना अनुदान आणि कर सवलत द्यावी लागेल.

दरम्यान, अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने २१ देशांची यादी जाहीर केली आहे ज्यांच्याशी अमेरिकेचा व्यापार संतुलित नाही. हे देश म्हणजे अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन युनियन, भारत, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड, तैवान, थायलंड, तुर्की, ब्रिटन आणि व्हिएतनाम आहेत. आता या देशांवर सुद्धा त्याच तोडीस तोड टॅरिफ लावून ट्रम्प यांनी डाव साधलाय.


 Give Feedback



 जाहिराती