पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पौड फाटा चौकातील उड्डाणपुलाच्या कठड्याला भरधाव दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकी चालक महाविद्यालयीन तरुणासह सहप्रवासी मित्राचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे. सर्वेश गोपाळ पाटील (वय २०), पुष्कर सुधाकर चौधरी (वय १९, दोघे रा. तुरक गुऱ्हाडा, जि. बऱ्हानपुर, मध्य प्रदेश) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार निषाद कोंडे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सर्वेश व त्याचा मित्र पुष्कर हे सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास पौड रस्त्याने निघाले होते. पौड फाटा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाजवळ आल्यानंतर सर्वेशचे भरधाव दुचाकीवरील नियत्रंण सुटले आणि तो कठड्यावर जाऊन आदळला. अपघातात दुचाकीस्वार सर्वेश आणि त्याचा मित्र पुष्कर यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.
अपघातात मृत्यू झालेले सर्वेश आणि पुष्कर हे दोघे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, अशी माहिती कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने यांनी दिली. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार अडागळे तपास करत आहेत.