सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • त्रिबंकेश्वर मंदीर अ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून जाहीर
 विश्लेषण

पुण्याला पावसाने झोडपले; पेठ भागात जोरदार हजेरी, नागरिकांची त्रेधातिरपीट

डिजिटल पुणे    03-04-2025 18:28:42

पुणे: राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान गेले तीन ते चार दिवस पुण्यात देखील ढगाळ हवामान दिसून येत होते. आज अखेर पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. पुण्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी  लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडलेली पाहायला मिळाली. पावसाच्या सरी कोसळल्याने मातीचा छान सुगंध दरवळत होता.

जवळपास पुणे शहर आणि उपनगर या भागात पावसाने काही काळ हजेरी लावली. अचानक पाऊस आल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्याच्या बाजूला थांबून आसरा घ्यावा लागला. अजूनही काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासाह पाऊस सुरू आहे. सदाशिव, शुक्रवार, नवी, नारायण पेठ भागात अजूनही पाऊस सुरू आहे.पुण्याच्या काही भागात गारांचा वर्षाव देखील झाल्याचे समोर येत आहे. खंडकवासला धरण क्षेत्र, बालेवाडी , स्वारगेट , धनकवडी भागात देखील हलक्या सरी कोसळत आहेत.

अवकाळी पावसाचा आंबा, काजूच्या बागांना मोठा फटका

रत्नागिरी जिल्हयावर वादळी वाऱ्यांची निर्मिती झाल्याचे म्हटले जात आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकणात अवकाळी पाऊस पहायला मिळणार आहे. कोकण विभगाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी तयार झालेले आंबे झाडावरून तुटून गेले आहेत. लहान लहान कैरी देखील गळून पडल्या आहेत. ढगाळ आणि पावसाळी वातावरण झाल्याने आंब्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे

हवामान विभगाने राज्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात वादळी वाऱ्यासाह पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे. हवामान विभगाने राज्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती