पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी करत एका गर्भवती महिलेला वेळेवर दाखल करून घेतले नाही. यामुळे तनिषा सुशांत भिसे (वय २७) या महिलेचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला.
पैशांशिवाय उपचार नाहीत? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा धक्कादायक निर्णय!
तनिषा भिसे यांना प्रसूतीसंबंधी तातडीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने थेट १० लाख रुपयांच्या डिपॉझिटची मागणी केली!
रुग्णाचे कुटुंब अडीच लाख रुपये तत्काळ भरण्यास तयार होते, पण तरीही रुग्णालयाने दाखल करून घेतले नाही.दरम्यान, थेट मंत्रालयातून रुग्णालयाला फोन गेला, पण तरीही प्रशासन ऐकायला तयार नव्हते!
प्रचंड रक्तस्त्राव, उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू!
रुग्णालयाने वेळेवर दाखल करून न घेतल्यामुळे कुटुंबीयांना तनिषा भिसे यांना इतर हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले, पण याच प्रक्रियेत अमूल्य वेळ वाया गेला आणि उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला.
तनिषा भिसे यांनी पिंपरी-चिंचवडमधील एका रुग्णालयात जुळ्या बाळांना जन्म दिला होता. मात्र, प्रचंड रक्तस्त्रावामुळे त्यांना तातडीच्या उपचारांची गरज होती, पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांसाठी तिष्ठत ठेवले आणि त्यांचा मृत्यू झाला!
मृत महिलेचे पती भाजप आमदारांचे स्वीय सहाय्यक, आमदारही हतबल!
तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही संतापाची लाट उसळली आहे.
“हे अमानवी आहे! दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा हा हलगर्जीपणा आणि व्यावसायिक दृष्टिकोन असह्य आहे. मी येत्या अधिवेशनात या प्रकरणावर आवाज उठवणार!”– आमदार अमित गोरखे
रुग्णालय प्रशासनाविरोधात कठोर कारवाईची मागणी!
रुग्णालय प्रशासनाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, पैशांशिवाय उपचार न देणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थेचा तीव्र निषेध केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि पुणेकर आक्रमक झाले असून, दोषींवर फौजदारी कारवाई व्हावी, हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा, अशी जोरदार मागणी होत आहे!
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गप्प! कोणाचा आहे ‘त्यांना’ पाठींबा?
या प्रकरणावर अद्याप दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.
या धक्कादायक घटनेनंतर ‘आरोग्य हे सेवा आहे की व्यवसाय?’ असा प्रश्न पुणेकरांसमोर उभा राहिला आहे. सरकार या अमानुष प्रकारावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे!