पुणे : दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील मुजोरीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. संबंधित महिला ही पुण्यातील भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. विशेष करून त्या महिलेला जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र तिचा मृत्यू झाल्याने पुण्यात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता दिनानाथ मंगेशकर रूग्णालयावर टिकेची झोड उठवली जात आहे. अशातच आता राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर चिल्लर फेक आंदोलन सुरू करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णाच्या उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केली होती. महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर रुग्णाकडे उपचारांसाठी दहा लाखांची मागणी केली होती. हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही प्रशासन महिलेला दाखल करण्यास तयार नव्हते.
शेवटी दूसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. याचदरम्यान आता शिंदे शिवसैनिकांकडून रुग्णालयावर चिल्लर फेकत संताप व्यक्त करण्यात आला.
पुण्यातील ही घटना समोर आल्यानंतर सगळीकडून रूग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता रूग्णालयाबाहेर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. चॅरिटेबल ट्रस्ट असून रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केली आहे.या घटनेवर मंगेशकर कुटुंबाने रूग्णालयाच्या बेफिकिरीवर उत्तर द्यावं, अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे.
दरम्यान, घटना घडल्यानंतर सकाळपासूनच पोलिसांचा याठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना पोलिसांनी रूग्णालयाच्या गेटवरच अडविले आहे. यानंतर शिवसेनेचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांवरच चिल्लर फेकली. त्यामुळे रूग्णालय बाहेरील परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.