सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नाना पेठ येथील वाड्याला लागली भीषण आग,आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .
 विश्लेषण

दीनानाथ रुग्णालय प्रकरण- “आरोग्यदूत”ला स्वतःच्या पत्नीसाठीही उपचार मिळाले नाहीत

अजिंक्य स्वामी    04-04-2025 14:07:47

पुणे : रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या, समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या सुशांत भिसे यांच्या कुटुंबालाच वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत! दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि पैशांच्या हव्यासामुळे सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या नातेवाईकांसह पुणेकर नागरिक व्यक्त करत आहेत.

भिसे यांना मिळाला होता आरोग्यदूत पुरस्कार

सुशांत भिसे हे सामर्थ्य प्रबोधनीचे संस्थापक अध्यक्ष होते आणि या संस्थेमार्फत ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले. विशेषतः रुग्णसेवा, मदतीसाठी रक्तदान शिबिरे आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे “आरोग्यदूत” पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. मात्र, दुर्दैव असे की ज्याने आयुष्यभर इतर रुग्णांसाठी झटले, त्याच्याच पत्नीला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत!

आठ वर्षांनी आलेल्या आनंदावर पाणी फेरले

सुशांत आणि तनिषा भिसे यांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. कर्वेनगरमध्ये त्यांचा संसार आनंदाने फुलला होता. तनिषा या पूर्वी शिक्षिका होत्या, मात्र लग्नानंतर त्यांनी नोकरी सोडली. दरम्यान, सुशांत भिसे यांना प्रशासकीय विभागात नोकरी मिळाली आणि त्यांचा सुखी संसार सुरू झाला. तब्बल आठ वर्षांनी त्यांच्या आयुष्यात मोठा आनंद आला होता—तनिषा गर्भवती होती. पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या असंवेदनशील वर्तणुकीमुळे आणि पैशाच्या हव्यासामुळे हे सुख त्यांना उपभोगता आले नाही.

१० लाखांची मागणी आणि उपचाराला विलंब?

माहितीनुसार, तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी १० लाख रुपयांचे डिपॉझिट भरण्यास सांगितले. या विलंबामुळे उपचार मिळण्यात अडथळा निर्माण झाला आणि तनिषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

“रुग्णसेवेसाठी लढणाऱ्या व्यक्तीला हीच का शिक्षा?”

हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. ज्याने रुग्णसेवेसाठी स्वतः झटून अनेकांना मदत केली, त्याच्याच पत्नीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत, ही बाब अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक असल्याचे नागरिक म्हणत आहेत.

आरोग्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

रुग्णालयाने १० लाख रुपये मागितल्याचा आरोप तपासला जाणार

सीसीटीव्ही फुटेज आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार

पोलिस तपासानंतर अहवाल आरोग्य विभागाला सादर केला जाणार

नव्या नियमावलीची गरज – कठोर कारवाई होणार?

या दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरातून खासगी रुग्णालयांच्या मनमानीविरोधात आवाज उठत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सरकार नव्या नियमावलीवर काम करत आहे. मात्र, या प्रकरणात दोषींवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती