पुणे : पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील प्रशासनावर विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्विय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा पैशांअभावी उपचार केला नसल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केला होता. त्यानंतर दीनानाथ रुग्णालयाबाहेर राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. तसेच प्रशासनाने चौकशी समिती स्थापन करत अहवालही सादर केला होता. तर गरोदर महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाविरोधात राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या महिलेच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यानंतर आता या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलतांना भाष्य केले आहे.
यावेळी ते म्हणाले की, “दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय लतादीदी आणि मंगेशकर परिवाराने खूप मेहनतीने उभारले आहे. हे रुग्णालय अत्यंत नावाजलेले आहे. या रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. या रुग्णालयातील सगळ्याच गोष्टी चूक आहेत, असे म्हणता येणार नाही. कालचा प्रकार हा असंवेदनशील होता. जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावे लागेल” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल. ते ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर मला आनंद आहे. मात्र,जोपर्यंत मी नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत याप्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र, रुग्णालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण शो बाजी बंद झाली पाहिजे. घैसास यांच्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही. त्यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चूक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच, भिसे कुटुंबियांनी माझी भेट घेतली आहे. मी त्यांना आश्वस्त केलले आहे की, फक्त या प्रकरणासाठी कारवाई करायची नाही. तर भविष्यात पुन्हा ही बाब होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी, या दृष्टीने कारवाई करत आहोत. कमिटी सर्व प्रकारच्या गोष्टीत लक्ष घालणार आहे. या प्रकरणातील दोषींना शिक्षा झाली पाहिजे. भविष्यात अशा घटना घडू नये, या दृष्टिकोनातून आमचा विचार आहे. त्यावर आम्ही काम करू. मुळात आपण आता कायद्यात बदल करून काही अधिकार धर्मदाय आयुक्तांना दिले आहे. संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ऑनलाईनवर यावी. जेणेकरून कुठे बेड्स आहेत. किती उपलब्ध आहेत. बेड्स कुठे दिले जात नाहीत, याचे मॉनिटरिंग केले जावे, त्यात मुख्यमंत्री आरोग्य कक्ष जोडण्याचा प्रयत्न करत आहोत.जेणेकरून त्यांचावर दबाव राहिला पाहिजे. त्यात सुधारणा करत आहोत, असेही फडणवीस म्हणाले.