पुणे : भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिन! भारतीय जनता पार्टीच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त शहर भाजपच्या वतीने डीपी रस्त्यावरील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन पक्षाच्या ध्वजाला वंदन केले. तसेच, रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामांचे त्यांनी पूजन केले. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. पक्षाचा ज्यांनी पाया रचला, त्यांच्या योगदानाची जाणीव कार्यकर्त्यांनी ठेवावी, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित राहून भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिला. दुग्धशर्करा योग म्हणजे आजच्या वर्धापनदिनी श्रीराम नवमीचेही महापर्व आहे. या औचित्याने प्रभू श्रीरामांना अभिवादन नमन केले.
भाजपने पुणे शहरात साडेपाच लाख प्राथमिक सदस्यांची नोंदणी पूर्ण केली असून 9 हजार सक्रिय कार्यकर्त्यांचे लक्ष्य लवकरच पूर्ण होणार आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने 1 हजार जुन्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री माधुरीताई मिसाळ, खा. मेधाताई कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार हेमंत रासने यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.