पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे पुण्यात वातावरण चांगलंच तापलं होतं. या घटनेनंतर शहरात पुणे भाजप महिला आघाडीकडून डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयात जोरदार तोडफोड केली. आता या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. डॉक्टरांच्या गैरवर्तणुकीमुळे महिलेला जीव गमवावा लागला, असा ठपका ठेवण्यात आला. यानंतर त्यांनी राजीनामा दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर राज्य शासनाने आरोग्य विभागाला अहवाल सादर कऱण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने आपला प्राथमिक अहवाल शासनाला सादर केला. शुक्रवारी युद्धपातळीवर चौकशी करून समितीने निष्कर्ष काढला की, संबंधित गर्भवती महिलेला तातडीने रुग्णालयात भरती करून उपचार देणे आवश्यक होते. मात्र, रुग्णालयाने तसे न करता भरतीस नकार दिला, त्यामुळे महिलेला प्राण गमावावे लागले, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानंतर डॉ. सुश्रुत घैसास यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्राथमिक निष्कर्षानंतर आता सविस्तर चौकशी अहवाल दोन ते तीन दिवसांत शासनाकडे सादर केला जाणार आहे. गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य शासनाने चौकशी समिती नेमली असून, यासंदर्भात गंभीर आरोप समोर आले आहेत. निषा भिसे या अल्पवयीन रुग्णाच्या उपचारासाठी डॉ. घैसास यांनी अमानत रक्कम भरावी लागेल, अशी अट घातल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता. या आरोपानंतर सोशल मीडियावर रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी अशा वर्तणुकीचा निषेध करत रुग्णालय व्यवस्थापनाकडून कारवाईची मागणी केली.
डॉ. घैसास हे रुग्णालयातील अत्यंत अनुभवी आणि कुशल डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या विरोधात झालेल्या आरोपांमुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर निर्माण झालेला ताण आणि रुग्णालयाच्या प्रतिमेला झालेली हानी लक्षात घेता त्यांनी पदाचा राजीनामा देणे पसंत केले. राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, "या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालयाच्या नावलौकिकावर गालबोट लागत असून, माझ्या उपस्थितीमुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे. रुग्णसेवा हे माझे सर्वोच्च कर्तव्य असून, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, हीच माझी भूमिका आहे."
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली असून, तनिषा भिसे प्रकरणातील सत्य काय आहे, हे लवकरच स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रातील नीतिमूल्ये, जबाबदारी आणि रुग्णांच्या हक्कांबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. रुग्णाच्या कुटुंबीयांनी आता न्याय मिळावा, दोषींवर कारवाई व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी रुग्णालय प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, डॉ. घैसास यांचे समर्थक आणि काही रुग्णही सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ व्यक्त होत असून, त्यांनी आतापर्यंत दिलेल्या वैद्यकीय सेवांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपशील पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता असून, वैद्यकीय प्रशासन आणि रुग्णालय यांच्यासमोरील आव्हाने आता अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. रुग्णालय प्रशासनाची बदनामी, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय आणि चौकशीला कंटाळून डॉ. घैसास यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. केळकर हे काही वेळात पत्रकार परिषद घेऊन घडलेली घटना व घैसास यांच्या राजीनाम्याबद्दल बोलतील.