सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नाना पेठ येथील वाड्याला लागली भीषण आग,आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .
 विश्लेषण

कायद्याचा धाक, प्रबोधनामुळे अमली पदार्थसंबंधी गुन्ह्यांना आळा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

डिजिटल पुणे    07-04-2025 18:40:12

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांचा व्यवसाय करणे फायद्याचे नाही, असा संदेश त्या तस्करांपर्यंत जावा, असा संकल्प करून सुमारे दोन महिन्यांपूर्वी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने कामाची सुरवात केली होती. त्या संकल्पसिद्धीकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या दोन महिन्यात कायद्याचा धाक, प्रबोधन या दोन्ही आघाड्यांवर कार्यवाही केल्याने जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी गुन्ह्यांना आळा बसला असून, संबंधित सर्व विभागांनी यापुढेही परस्पर समन्वयाने अमली पदार्थ तस्करांची पाळेमुळे खणून काढून जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी नियमित कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सातव्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषद कक्षात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

अमली पदार्थ तस्करीविरोधात गत दोन महिन्यात केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने समाधान व्यक्त करत पालकमंत्री पाटील म्हणाले, गत दोन महिन्यात पोलीस विभागाने अमली पदार्थ विरोधात 30 कारवाया केल्या असून, 50 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुन्हे व अमली पदार्थ विषयक गुन्हे नियंत्रणात आले आहेत. कायद्याचा धाक, प्रबोधन आणि व्यसनाधीनांना त्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन उपचार केंद्र अशा सर्व आघाड्यांवर सांगली जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्याचा ध्यास घेतला असून सर्व यंत्रणांनी त्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शासकीय व खासगी तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनीही तंबाखूमुक्त शाळांप्रमाणे अमली पदार्थविरोधी प्रबोधनासाठी विविध उपक्रम आयोजित करावेत, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अमली पदार्थ विरोधी प्रबोधनात्मक लघुचित्रफीत, जिंगल, पोस्टर, निबंध आदि विविध स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला असून, या माध्यमातून स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धक, त्याचे कुटुंबिय व संबंधित व्यक्तींना प्रेरणा मिळाली आहे. यातील विजेत्यांच्या लघुचित्रफीत, जिंगल, पोस्टर, निबंध यांना वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया व सामाजिक माध्यमांवर व्यापक प्रसिद्धी द्यावी. तसेच अमली पदार्थ विरोधी प्रबोधनात्मक सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण 1 मे रोजी स्वतंत्र कार्यक्रम घेऊन करण्यासाठी नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील 77 पैकी 76 व्हिडिओ पार्लरची तपासणी पूर्ण झाल्याचे यावेळी सांगितले. त्यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, मद्यविक्री दुकानांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमावली तयार करावी. मद्यविक्री दुकाने अशा गुन्ह्यांची केंद्रे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यासाठी मद्यविक्री दुकान मालकांना त्यांच्या दुकानाच्या परिसरात गुन्ह्यांना प्रवृत्त करणारे वातावरण होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्याबाबत व तसे न केल्यास करण्यात येणाऱ्या दंडाबाबत नोटीस काढावी. अमली पदार्थ व्यसनाधीनांना समुपदेशन, उपचार व चिकित्सा केंद्र कार्यवाहीस गती द्यावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

क्राईम टास्क फोर्सच्या कार्यवाहीचाही आढावा

सांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस आयुक्त रितू खोकर यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचाही पालकमंत्री पाटील यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषद कक्षात ही बैठक झाली.

अनावश्यक शस्त्र परवाने रद्द करावेत, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील गुन्हे घरगुती कारणांतून होत असून, अशा गुन्ह्यांमध्ये ते घडू नयेत यासाठी समुपदेशन व प्रबोधनाचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर प्रशासनाने छोट्या पोलीस चौक्यांसाठी जागा अंतिम करावी. यातून धाक राहून गुन्हेगारी घटना कमी होण्यासाठी, गुन्हेगारी घटना घडू नयेत, यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर गुन्हा घडला की लवकरात लवकर गुन्हे उकल करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे कौटुंबिक गुन्हे कमी होण्यासाठी मदत होईल. अशा संभाव्य गुन्हेगारांना वचक बसेल, असे ते म्हणाले.

शिवजयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करतानाच दोन्ही महापुरूषांच्या प्रतिमा प्रत्येकाच्या घरात असाव्यात, असे आवाहन करून पालकमंत्री पाटील म्हणाले, आगामी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे, सकारात्मक पद्धतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी. मिरवणुका शांततेत काढाव्यात. डॉल्बीला कुठल्याही प्रकारे परवानगी दिली जाणार नाही. पोलिसांनीही यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे ते म्हणाले.

 


 Give Feedback



 जाहिराती