पुणे : शहरात विविध ठिकाणी दुचाकीं वर कारवाई करण्यात येते व ती योग्य देखील आहे. बेशिस्त वाहन चालक, बेशिस्त पार्किंग ही समस्या आहेच. मात्र नो पार्किंग मधील दुचाकी उचलताना अनेक ठिकाणी वादावादी च्या घटना घडतात. त्याचे व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल होत असतात.
मी रहात असलेल्या कर्वेनगर भागात रोजच कारवाई होत असते.कर्वे स्त्री शिक्षण संस्था ते दुधाने लॉन्स च्या अरुंद रस्त्यावर आपली गाडी दुचाकी उचलायला लागली की तेथे वाहतूक कोंडी नित्याचीच.सध्या वाहतूक पोलीस आणि सामान्य नागरिकांमध्ये अनावश्यक दुरावा निर्माण झालाय. यासाठी मी खालील मागण्या आग्रहपूर्वक मांडत आहे....
1) अलका चौक ते शहरभर कुठे ही बघा वाहतूक पोलीस घोळका करून, सिग्नल पासून लांब लपून छपून उभे असतात. नो एंट्रीत देखील कुठे तरी मध्ये उभे असतात. यातून नागरिकांना प्रश्न पडतो की शहर वाहतूक कोंडीत अडकलं असताना वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमनासाठी आहेत की फक्त पावत्या फाडायला. तरी याबाबत पोलिसांना योग्य सूचना देऊन हे प्रकार बंद करावेत ही मागणी करत आहे.
2) दुचाकी उचलणारी गाडी आल्यावर जर नियम मोडणारी एखादी व्यक्ती जागेवर दंड भरायला तयार असेल तर तो भरून घ्यावा, केवळ निधी वाढीसाठी दुचाकी लांब पोलीस चौकीवर नेऊ नये ह्याबाबत निर्देश द्यावेत.


3) दुचाकी वर कारवाई करताना शेजारी उभ्या असलेल्या चार चाकी किंवा तीन चाकी टेम्पो वर कारवाई करत नाहीत आणि याचे तीव्र पडसाद उमटतात. तरी दुचाकी उचलताना जर नो पार्किंग मध्ये चार चाकी असेल तर त्याला जॅमर लावावा अथवा मोबाईल वरून दंड लावल्यास सामान्य नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार नाही.तरी तसे आदेश निर्गमित करावे ही विनंती.
4) रोजच वाहतूक कोंडी होणाऱ्या भागात वाहतूक पोलीस अथवा वॉर्डन दिसत नाहीत, तरी आपणच दिलेल्या आश्वासनानुसार ते दिसावेत ही माफक अपेक्षा.
5) शहरात अनेक ठिकाणी पी 1,पी 2,नो पार्किंग, नो एंट्री इ वाहतूक नियमनाच्या फलकांची दुरावस्था दिसून येते. तरी हे फलक सुस्थितीत करण्याबाबत पावले उचलावीत ही विनंती.
6) शहरातील जड वाहनांची वाहतूक सर्रासपणे सुरु असल्याचे दिसत आहे. सोबत जोडलेल्या फोटोत एकीकडे पोलीस दुचाकी वर कारवाई करत आहेत तर दुसरीकडे मोठा मिक्सर जाताना दिसत आहे. ह्या विरोधाभासामुळे नागरिक पोलीसांबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसतात. तरी ह्या परिस्थितीत बदल व्हावा.
आपण वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कार्यवाही कराल असा विश्वास वाटतो.
आपला,
संदीप खर्डेकर.
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र.
मो - 9850999995