पुणे : महापुरुष अभिवादन कृती समितीच्या वतीने महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने तब्बल दहा हजार किलोची भव्य एकता मिसळ तयार करण्यात आली आहे. पुण्यातील गंज पेठ येथे महात्मा फुले वड्याच्या बाहेर ही मिसळ बनविण्यात आली आहे. सकाळपासून नागरिक या मिसळचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. पुणेरी मिसळ जगप्रसिद्ध आहे असं म्हणतात. त्यामुळे या मिसळीला शहरात खूप मागणी आहे. तसंच मिसळमध्ये जसे विविध पदार्थ एकसंध होऊन वेगळाच आनंददायक आस्वाद तयार करतात. तसाच आस्वाद सामाजिक अभिसरणातून शिक्षणाच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी याच ठिकाणी मांडण्यास सुरवात केली होती. त्याचीच आठवण यानिमित्तानं जागवण्याचा महात्मा फुले कृती समितीचा मानस यातून दिसून येतो.
महापुरुष अभिवादन कृती समितीच्या वतीने प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य एकता मिसळ तयार करण्यात येत असते. यंदाचं हे तिसरं वर्ष असून या मिसळचं वर्ल्ड रेकॉर्ड देखील झालं आहे. आज महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने महात्मा फुले वाड्याच्या बाहेर तब्बल दहा हजार किलोची भव्य एकता मिसळ तयार आली असून ही मिसळ खाण्यासाठी सकाळपासून नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.
याबाबत महापुरुष अभिवादन कृती समितीचे कार्यकर्ते म्हणाले की, प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक संदेश म्हणून ही भव्य एकता मिसळ तयार करण्यात येत आहे. या मिसळच्या माध्यमातून एकतेचा संदेश देण्यात येत असतो आणि तब्बल पन्नास हजार हून अधिक नागरिक ही मिसळ आज खाणार आहेत, आणि यासाठी रात्रीपासून मिसळ तयार करण्यात येत आहे.