रायगड: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त अमित शाहांनी रायगडाला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार व खासदार उदयनराजे आणि अन्य नेतेमंडळी उपस्थित होते. यावली मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अपमान करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे अशी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत खासदार उदयनराजे यांनी मागणी देखील केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास शासनाकडून प्रमाणित करण्यात येईल.
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी कायदा करण्यात येईल. उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या आहेत. छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे. खरे तर टकमक टोकावरून त्यांचं कडेलोटच केला पाहिजे. मात्र आपण लोकशाहीमध्ये राहतो. त्यामुळे त्या संदर्भात नियमावली तयार करण्यात येईल. शिवरायांच्या स्मारकाचा विषय सुप्रीम कोर्टातून हायकोर्टात आला आहे. आता आम्ही हायकोर्टात लढा देऊन स्मारक उभारणीच्या लढ्यात यश मिळवू.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर आहेत. अमित शाह म्हणाले की, ‘आदिलशाही, निजामशाहीने वेढलेल्या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्यात बदलण्याचं काम आपल्या शिवाजी महाराजांनी केलं. त्यांच्यानंतर मराठ्यांनीही अटकेपार झेंडे रोवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. ज्यावेळी लोक स्वधर्म आणि स्वराज्याबाबत बोलणं गुन्हा समजू लागले होते. त्यावेळी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतली. मी आजपर्यंत अनेक नायकांची चरित्रं वाचली. मात्र शिवरायांसारख साहस मी एकाहीमध्ये पाहिलं नाही.’
अमित शाह म्हणाले, “मी येथे भाषण करण्यासाठी आलो नाही, तर प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे,” असे सांगत त्यांनी महाराजांच्या इतिहासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आमचे सरकार रायगडाला केवळ पर्यटनस्थळ बनवणार नाही, तर प्रेरणास्थळ बनवेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवाजी महाराजांची महानता महाराष्ट्रापुरती मर्यादित ठेवू नका, असा संदेश देत शाह म्हणाले, “मी महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. देश आणि जग त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. आपल्या स्वातंत्र्याची पहिली लढाई शिवाजी महाराजांनीच लढली होती.”