रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. शिवरायांना वंदन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे रायगड किल्ल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. अमित शाह हे शुक्रवारी रात्रीच पुण्यात दाखल झाले होते.
शाहांनी शिवरायांना केलं वंदन : अमित शाह हे सकाळी 11 वाजता रायगड किल्ल्याच्या पायथ्याला दाखल झाले. तिथं त्यांनी जिजाऊंना वंदन केलं. त्यानंतर अमित शाह हे रोपवेनं रायगड किल्ल्यावर दाखल झाले. तिथं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. यावेळी हजारो शिवभक्त गडावर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जगासाठी प्रेरणास्थान - अमित शाह
"मी राजमाता जिजाऊंना नमन करतो. त्यांनी शिवरायांना फक्त जन्मच दिला नाही तर बाल शिवरायांना त्यांनी स्वराज्य हा विचार दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं. सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी होतं तिथे मी शिवरायांना अभिवादन केलं त्यावेळी मनात आलेल्या भावना शब्दात मांडता येणार नाहीत. स्वराज्य, स्वधर्म यासाठी शिवरायांनी आयुष्य वेचलं. आदिलशाही, निजामशाही याने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणं लोक गुन्हा समजू लागले होते. पण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. मी आजवर अनेक नायकांची चरित्रं वाचली आहेत. मात्र असं साहस मी एकाहीमध्ये पाहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान आहेत," असं म्हणत अमित शाह यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं.
टकमक टोकावरुन ढकलून द्यावं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरुन ढकलून द्यावं, अशीच आमची भावना आहे. शिवस्मारक सुप्रीम कोर्टात अडकलं होतं. कुठल्याही परिस्थितीत हे स्मारक झालं पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे. तसंच दिल्लीत शिवस्मारक झालं पाहिजे ही मागणीही योग्यच आहे. आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हा विषय घेऊन जाऊ," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं - एकनाथ शिंदे :
"रायगडानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिला. तसंच रायगडानं महाराजांचा शेवटचा दिवसही पाहिला. महाराज अवघ्या ५० व्या वर्षी वारले. ते आणखी २० ते ३० वर्षे असते तर आपला सगळा इतिहास बदलून गेला असता," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला - उदयनराजे
"छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव हा विचार दिला. स्वराज्याची स्थापनाही त्यांनी केली. आज लोकशाही आहे, त्या काळात हा विचार छत्रपती शिवरायांनी दिला होता. लोकशाहीचा पाया छत्रपती शिवरायांनी रचला," असं यावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा करावा. कुठलाही जामीन त्या व्यक्तीला मिळू नये, यासह इतर काही मागण्या उदयनराजे यांनी केल्या आहेत.
देशाचे गृहमंत्री अमित शाह हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे. त्यामुळं अमित शाह यांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केलं. अमित शाह हे शुक्रवारी पुण्यात दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ स्वागतासाठी उपस्थित होते. रात्री 11 वाजता एकनाथ शिंदे देखील पुण्यात दाखल झाले. रात्री यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.