सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 व्यक्ती विशेष

दर्ग्यावर बुलडोझर फिरवण्यासाठी आजचा दिवस का निवडला? राऊतांचा सवाल, भाजपवर सोडला टीकेचा बाण

डिजिटल पुणे    16-04-2025 16:41:17

नाशिक :आज शिवसेना ठाकरे गटाचे  एक दिवसीय विभागीय निर्धार शिबिर नाशिकमधील गोविंदनगर भागातील मनोहर गार्डन लॉन्स येथे पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. या शिबिरात संध्याकाळी ६.३० वाजता उद्धव ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर शिबिराचे उद्घाटन पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या शिबिरात उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दुसरीकडे नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात असणाऱ्या सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस नाशिक महापालिकेने १५ दिवसांपूर्वी दर्ग्याला दिली होती. मात्र, कालपर्यंत दर्ग्याचे बांधकाम हटवण्यात आले नव्हते. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने पोलिसांच्या मदतीने आज (बुधवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली. पंरतु, हे बांधकाम हटवित असताना एका जमावाकडून मध्यरात्री अचानक पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले आहेत. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रण आणली आहे.

यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (बुधवारी) सकाळी माध्यमांशी बोलतांना भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “आमच्या शिबिरात अनेक प्रकारचे अडथळे घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते आम्हाला घाबरतात, शिवसेनेची अजूनही दहशत आहे. आज मला समजले की, या शहरात दर्गे हटाव मोहीम सुरू केली आहे. दर्ग्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. त्यासाठी आजचा दिवस का निवडला? गोंधळ निर्माण व्हावा, या शिबिरावरचे लक्ष दुसरीकडे जावे म्हणून दर्ग्यांवर बुलडोझर चालवायचा, मशिदींवर बुलडोझर चालवायचा, हे कसले लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे. तुम्हाला वातावरण नासवायचे आहे. वातावरण खराब करायचे आहे. मात्र ज्यांना देश तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले याचे काही आश्चर्य वाटत नाही”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “ही कारवाई नंतरही करता आली असती, पण आजचाच दिवस निवडला. आज येथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह महत्वाचे नेते येणार आहेत. शिवसेनेचे महत्वाचं शिबीर आणि अधिवेशन आज पार पडणार आहे. म्हणून त्यांनी आजचा दिवस निवडला , म्हणजे ते जळता, जळू आहात तुम्ही, डरपोक आहात. तुम्हाला आमच्या अस्तित्वाची, शिवसेनेच्या सावलीची भीती वाटते, म्हणून तुम्ही असे फालतू उद्योग, नसती उठाठेव करता. पंरतु, या शिबिरावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

तसेच “आम्ही सगळे लढणारे लोक आहोत, वर्षानुवर्ष आम्ही संघर्ष करत आहोत. सत्ता हा काही आमचा ऑक्सीजन नाही, पण सत्तेसाठी सोडून गेलेल्यांना आम्ही हुजरेगिरी करताना बघत आहोत. या राज्याची जनताही अस्वस्थ आहे, ज्याप्रकारे सत्ता परिवर्तन झालं त्याच्याशी जनता सहमत नाही. आम्हाला जनतेला आमच्यासोबत घ्यायचे आहे. निवडणुकांसाठी हे अधिवेशन नाही, पक्ष बांधणी, संघटना बांधणी आणि जनतेला सोबत घेऊन काम करणे हा आमचा मूळ उद्देश आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

भाजपचे लोक पंचांग घेऊन बसलेले असतात

सातपीर दर्ग्याला अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी नाशिक महापालिकेने पंधरा दिवसांची नोटीस बजावली आली होती. त्याची मुदत काल रात्री संपली. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतल्याचे बोलले जात आहे. याबाबत बोलतांना राऊत म्हणाले की,”पंधरा दिवसांपूर्वीच आजचा मुहूर्त काढला. भारतीय जनता पक्षाचे लोकांचा याबाबतीत कोणीच हात धरू शकणार नाही. ते आधी मुहूर्त काढतात, कधी कुठे दंगल घडवायची? कधी कोणावर कारवाई करावी? यासाठी त्यांचे लोक मुहूर्त काढून पंचांग घेऊन बसलेले असतात, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.


 Give Feedback



 जाहिराती