सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 व्यक्ती विशेष

शरद पवार-अजित पवार तिसऱ्यांदा एकत्र येणार;..! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

डिजिटल पुणे    16-04-2025 18:03:40

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. येत्या 21 एप्रिल रोजी, पुण्यातील साखर संकुल येथे सकाळी 9 वाजता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीदरम्यान दोन्ही नेते एकत्र उपस्थित राहणार आहेत. हे यंदाचे त्यांच्या दहा दिवसांतील तिसरे भेटीचे निमित्त असल्याने, राजकीय वर्तुळात चर्चांना नव्या उधाण आले आहे. या भेटीमुळे आगामी घडामोडींबाबत तर्कवितर्क आणि अंदाज वाढले आहेत.

गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि अजित पवार हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने वारंवार एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळे या भेटींना राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. “दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार का?” असा प्रश्नही आता जोरात विचारला जात आहे.

याआधी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. त्यानंतर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात हे दोघे पुन्हा एकत्र आले. त्या प्रसंगी माध्यम प्रतिनिधींनी अजित पवार यांना या भेटीबाबत प्रश्न विचारले होते, ज्यामुळे चर्चेला आणखी उधाण आले. या सातत्याने होणाऱ्या भेटीमुळे, दोन्ही नेत्यांमधील संबंध नव्याने उबदार होत आहेत का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली, तरी दोन्ही गटांतील नेते नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांची भेट वारंवार घडत असून, संवाद कायम असल्याचं दोन्ही बाजूंनी सूचित करण्यात येतं. विशेष म्हणजे, शरद पवार हेच आमचं दैवत आहेत, असं विधान दोन्ही गटांतून सातत्याने केले जात आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीचे गट पुन्हा एकत्र येणार का, यासंदर्भात राजकीय चर्चेला पुन्हा एकदा ऊत आला आहे.

अलीकडेच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी येथे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्कार समारंभात बोलताना म्हणाले, “शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो. आमच्या कुटुंबातही शरद पवार हे दैवत मानले जातात. मात्र आज देशाला नरेंद्र मोदींसारखा नेता मिळाला आहे, जो देशाची मान जागतिक स्तरावर उंचावत आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.”

या आधीही जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्र आले होते. त्यानंतर साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतही शरद पवार आणि अजित पवार यांची उपस्थिती होती आणि तेथेही त्यांच्यात संवाद झाल्याचं दिसून आलं. आता 21 एप्रिल रोजी पुण्यात होणाऱ्या AI विषयक बैठकीत हे दोघे नेते पुन्हा एकत्र येणार असल्याने, राजकीय वर्तुळात चर्चांना नवे आयाम मिळाले आहेत.ही फक्त औपचारिक भेट आहे की यामागे काही संकेत दडले आहेत, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती