सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 शहर

यशदा येथे ग्रामविकास विभागाच्या दोन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात

डिजिटल पुणे    26-04-2025 17:46:48

पुणे : ग्रामविकास विभाग प्रगतीपथावर घेऊन जाण्यामध्ये जिल्हा परिषद हा महत्त्वाचा घटक असून ग्रामविकासाला अधिक चालना देण्यासाठी व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.ग्रामविकास विभागाच्यावतीने यशदा येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेला सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक उपस्थित होते.

मंत्री श्री. गोरे म्हणाले, विचारांची देवाणघेवाण करुन चर्चेतून प्रचंड वेगाने प्रशासन प्रगतीपथावर गेले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. शासनाच्या योजना, निर्णय, धोरणे ग्रामस्तरावर पोहोचविण्याची जिल्हा परिषदेची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद यंत्रणांनी सकारात्मक भूमिका ठेवून काम करावे व यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करावा. त्यासाठी आवश्यक असल्यास कामकाज व्यवस्थेत बदल करावा. शासन निर्णयांची अंमलबजावणी करताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.ते म्हणाले, ग्रामविकास विभागामार्फत सर्वांसाठी घरे योजना राबविण्यात येत आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत २० लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून उर्वरित १० लाख घरांना लवकरच मान्यता मिळेल.ही घरकुल योजना परिणामकारक नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. घरकुलासाठी पात्र लाभार्थ्याचे सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करावे, घरकुलांच्या जागेसाठी गायरान, गावठाण येथे जागा उपलब्ध करुन देण्याच्या कामाला विभागीय आयुक्तांनी प्राधान्य द्यावे. राज्यात गतीने व परिणामकारक कामाच्या दृष्टीने १०० दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे. त्यातही ग्रामविकास विभाग आघाडीवर आहे. प्रत्येक जिल्ह्याने नवीन संकल्पना राबवाव्यात. बचत गटाच्या महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी ‘वूमन मॉल’ बनविण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत असे सांगून अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, नवीन संकल्पनांची देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामविकासासाठी संवेदनशीलतेने काम करावे. क्षेत्रीय स्तरावर पोहोचून योजनांना गती द्यावी. जिल्हा परिषदेने विविध कल्पना राबवाव्यात. यासाठी शासन पाठीशी राहील. शासन आणि प्रशासन एकत्र आल्यास प्रगती निश्चित होईल. ही, कार्यशाळा सर्वांसाठी उर्जादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हे व्यासपीठ असून समांतर पातळीवर विचारांची देवाण घेवाण होणे हा कार्यशाळा आयोजनामागचा उद्देश असल्याचे श्री. डवले यांनी प्रास्ताविकात सांगितले.सुरुवातीला पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती