पुणे : वारकरी सांप्रदायात आषाढी एकादशीला खास महत्व आहे. या खास दिवशी राज्यासह शेजारील राज्यातील वारकरी मंडळी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. यातील बहुतांनी वारकरी पायी दिंडीत चालत विठुनामाचा गजर करत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात आणि चंद्रभागेत स्नान करतात. दरवर्षी आळंदीवरुन संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्याही पंढरपूरला जातात. आता या दोन्ही पालख्यांचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक पालख्या पंढरपूरला आषाढी एकादशीसाठी जात असतात. यातील संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांना खास महत्व आहे. यंदा 18 जून 2025 रोजी देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. तसेच 19 जून 2025 रोजी आळंदीतून ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. या दोन्ही पालख्यांसोबत लाखो वारकरी पायी पंढरीला जाणार आहेत.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे वेळापत्रक
संत तुकाराम महाराजांची पालखी 18 जून रोजी निघणार आहे. या पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे. दुसरा मुक्काम पुणे शहरातील नानापेठेत असणार आहेत. 21 जून रोजी तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा विठ्टळ मंदिरात असेल. 22 जूनला या पालखीचा मुक्काम लोणीकारभोर मध्ये असणार आहे. त्यानंतर 23 तारखेला यवत, 24 तारखेला वरवंड, 25 तारखेला उडंबडी गवळ्याची, 26 तारखेला बारामती, 27 जून सणसर, 28 जून निमगाव केतकी, 29 जून इंदापूर, 30 जून सराटी, 1 जुलै अकलूज, 2 जुलै बोरगाव श्रीपूर, 3 जुलै पिराची कुरोली, 4 जुलै वखारी (पंढरपूर) येथे तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रवास
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जून रोजी आळंदीतून निघणार आहे. त्यानंतर 20 जून रोजी पुण्यातील भवानीपेठेत माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. 21 जून रोजीही पुण्यातच ही पालखी मुक्कामी असणार आहे. ही पालखी 22 जून रोजी सासवडच्या दिशेने निघणार आहे. ही पालखी 24 जून जेजुरी, 25 जून वाल्हे, 26 जून रोजी लोणंद, 27 जून तरडगाव, 28 जून फलटण आणि 29 जून बरड येथे मुक्कामी असेल. माऊलींची पालखी 30 जून नातेपुते, 1 जुलै रोजी माळशिरस, 2 जुलै रोजी वेळापूर, 3 जुलै भंडीशेगाव आणि 4 जुलै वाखरी येथे मुक्कामी असणार आहे. या दोन्ही वाऱ्यांसोबत लाखो वारकरी पंढरीला विठूरायाच्या दर्शनाला जाणार आहेत.