अनुमान किंवा कल्पना निरसन (भाग २)
कल्पून निर्मिले मंत्र | देव ते कल्पनामात्र | देव नाही स्वतंत्र | मंत्राधेन ||९/५/२१||
कोणीतरी कल्पनेने मंत्र रचतो, त्या मंत्राची देवता कल्पनेतून निर्माण होते. सर्व देव मंत्रांच्या अधीन आहेत.
या गोष्टी स्पष्ट बोलण्याच्या नसून मनातल्या मनात ओळखून असाव्यात. चालण्याच्या पद्धतीवरून आंधळा व्यक्ती ओळखला जातो. तसे बोलणे अनुभवाचे आहे का नाही हे शहाणे ओळखतात. ज्याला जसा भास झाला तसे त्याने देवतांवर कवित्व केले. हे केलेले वर्णन अनुभवावरून ठरवले पाहिजे.
जसे – ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले मग त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्मिले ? विष्णूने विश्व पालन केले मग त्या विष्णूस कोण पाळते ? विश्वसंहार कर्ता रुद्र आहे मग त्या रुद्राचा संहार कोण करतो ? काळ सगळ्यांचे नियमन करतो मग त्याचे नियमन कोण करतो ? असे प्रश्न पडतात पण यांची उत्तरे देता येत नाहीत तोपर्यंत अज्ञानाचा अंधार दूर होणार नाही. म्हणून सारासार विचार करावा.
जे पिंडी ते ब्रह्मांडी असे मानण्यात कशा अडचणी येतात ते आता बघू. ब्रह्मांड आपोआप घडले पण त्याची रचना पिंडासारखी आहे अशी कल्पना केली आहे. पण याचा अनुभव कोणाला कधी आला नाही. याचा शोध घेऊ गेल्यास अनेक संशय निर्माण होतात. म्हणून ही कल्पना आहे हे निश्चितपाने समजावे. ब्रह्मांडात असंख्य पदार्थ आहेत मग हे सर्वच पिंडात कसे असतील ? उदा. – ब्रह्मांडात साडेतीन कोटी भुते आहेत, साडेतीन कोटी तीर्थे आहेत, साडेतीन कोटी मंत्र आहेत, तेहेतीस कोटी देव आहेत, अठ्ठ्यांशी हजार ऋषीश्वर आहेत, नऊ कोटी कात्यायनी देवता, छपन्न कोटी चामुंडा, चौऱ्याशी लाख योनी, असे कोट्यावधी जीव आहेत, असंख्य वनस्पती, असंख्य रसाळ फळे, अनेक प्रकारची बीजे, धान्ये आहेत, हे सगळे पिंडात कसे असेल ? म्हणून उगाच पिंडा ब्रह्मांडाची रचना एकसारखी आहे असे उगाच बोलू नये.
आता पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय ? याचा नेमका खरा अर्थ समजून घेऊ – सर्व विश्व पंचमहाभूतांनी बनलेले आहे. पिंड देखील त्यापासूनच बनलेला आहे. हेच सत्य आहे आणि याचा रोकडा अनुभव घेता येतो. हे अनुभवाचे ज्ञान निश्चयात्मक असते. बाकी सर्व कल्पना मात्र आहे. हे कल्पनेचे ज्ञान ओकारीसारखे समजावे आणि बाजूस सारावे. कारण ब्रह्मांडातील सर्व स्थाने आणि पदार्थ एका पिंडात बघणे कल्पनेचा खेळ आहे. खरे सत्य हे आहे की हा सारा पंचमहाभूतांचा खटाटोप आहे जो पिंडी ते ब्रह्मांडी चालू आहे.
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)