पुणे : उन्हाळा आता संपत आला आहे. त्यात मान्सूनच्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती असल्याने यावर्षी मान्सूनचा पाऊस थोडा लवकर येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 13 मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात मान्सूनच्या पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरवर्षी सरासरी 22 मे रोजी मान्सूनचा पाऊस अंदमानात येतो. मात्र, यावर्षी तो आठ दिवस आधीच येण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याने, यावर्षी मान्सून दक्षिण अंदमान आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात आठ दिवस आधी पोहोचण्याची शक्यता आहे. अंदमानमध्ये आठ दिवस आधी मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता असली तरी, तो मुख्य भूमीवर म्हणजेच केरळमध्ये कधी पोहोचेल, हे अद्याप निश्चितपणे सांगता येत नाही. हवामान विभागाने 15 मे रोजी या संदर्भात अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती दिली आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
हवामान खात्याने म्हटले आहे की, यावेळी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जास्त पाऊस पडू शकतो. यावेळी ला निना किंवा एल निनोसारखी परिस्थिती राहणार नाही, म्हणजेच बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तटस्थ परिस्थिती असेल.
सरासरीच्या 105 टक्के पडणार पाऊस
भारतीय हवामानशास्त्र विभागाने हंगामी पावसाचा अंदाज दीर्घकालीन सरासरीच्या 105% इतका वर्तवला आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये सुरू होतो आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत माघार घेतो. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने कृषी क्षेत्राला अत्यंत आवश्यक असलेली चालना मिळू शकते, असे मंत्रालयाने म्हटले आहे.