मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे भारत आणि पाकिस्तान मध्ये जोरदार युद्ध सुरु असताना दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ड्रोनच्या घिरट्या सुरु आहेत. मुंबईतील हजरत तय्यद जलाल मस्जिदच्या वरती हा ड्रोन दिसून आला होता, त्यानंतर तो गायब झाला. स्थानिक नागरिकांनी याबाबत दावा केला आहे, यानंतर साकीनाका पोलिस तातडीने ऍक्शन मोड मध्ये आले असून कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं.. मात्र पोलिसाना काहीही संशयास्पद आढळलेले नाही. मात्र या घटनेने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे
मस्जिदच्या वरती हा ड्रोन दिसून आला
प्राथमिक माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहार विमानतळ येथून यासंदर्भात फोन आला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. हजरत तय्यद जलाल मस्जिदच्या वरती हा ड्रोन दिसून आला होता. काही क्षणांतच तो ड्रोन साकिनाका झोपडपट्टी परिसराच्या दिशेने गेला. एकीकडे देशात युद्धाची परिस्थिती असताना आणि पाकिस्तान ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नात असताना मुंबईत ड्रोनच्या घिरट्या पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साकीनाका पोलीस आणि सीआयएसएफ यांनी हरी मस्जिद परिसर जरीमरी येथे पहाटे पाच वाजताच्या दरम्यान कोंबिंग ऑपरेशन केले आहे. मात्र, यात असे ड्रोन वैगरे काहीही आढळून आले नाही. तरी नागरिकांनी पॅनिक होऊ नये, असे आवाहन साकीनाका पोलिसांनी केले आहे.
मुंबई हि नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली आहे. देशावर सूद उगवायचा असेल तर अतिरेक्यांकडून सतत मुंबईवर हल्ला केला जातो हा इतिहास आहे. यापूर्वी १९९३ चा साखळी बॉम्बस्फोट आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामुळे मुंबई हादरली होती. आताही देशातील एकूण युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे की, कोणीही कोणत्याही दर्जाच्या अधिकाऱ्याला नवीन रजा मंजूर करणार नाही. सतर्कतेचा इशारा लक्षात घेऊन, सर्व पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात राहण्यास आणि प्रत्येक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांशी उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर भारत पाकिस्तानविरोधात सर्वात मोठा आणि निर्णायक कारवाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतले जातात, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.