नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ले केले. लष्कर, जैश आणि हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारताने स्पष्ट केलं होतं की, त्यांचे हल्ले केवळ दहशतवादी अड्ड्यांवरच मर्यादित होते, पाकिस्तानी लष्करी तळ किंवा नागरी भागांना लक्ष्य करण्यात आलं नव्हतं.
मात्र, पाकिस्तानने याला उत्तर देताना भारतीय लष्करी तळांवर आणि नागरी भागांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले केले. भारताच्या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टमने हे बहुतेक हल्ले हवेतच निष्क्रिय केले. भारताच्या संयमी, पण ठोस प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली.
आम्हाला शांततेची इच्छा आहे
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी स्थानिक जिओ टीव्हीशी बोलताना सांगितले की, “भारत आक्रमकता थांबवेल, तर पाकिस्तानही तणाव कमी करेल. आम्ही युद्ध नको म्हणतो, आम्हाला शांततेची इच्छा आहे.” त्यांनी हेही सांगितले की, पाकिस्तानने अमेरिका व इतर देशांशी संपर्क साधला असून, भारतानेच आता पाऊल मागे घ्यावं.
दरम्यान, भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने ‘ऑपरेशन बुनयान उल मर्सूस’ नावाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उधमपूर, पठाणकोट, बठिंडा आणि भुज येथील भारतीय एअर फोर्स बेसला लक्ष्य केलं. पण त्यांच्या उच्च गतीच्या क्षेपणास्त्रांना भारतीय एअर डिफेन्सने निष्क्रिय केलं.
भारताने यानंतर प्रत्युत्तर देताना पाकिस्तानमधील रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनिया येथील लष्करी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांत पाकिस्तानच्या तांत्रिक केंद्र, कमांड अँड कंट्रोल रूम, रडार केंद्रे व शस्त्र साठ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हे हल्ले करताना भारताने नागरी भागांना कोणताही इजा होऊ नये, याची विशेष खबरदारी घेतली.
यामुळे पाकिस्तानला समजलं की भारताच्या लष्करी क्षमतेची व्याप्ती खूप दूरपर्यंत आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानचे मंत्री एकामागोमाग एक शांततेच्या वाटा शोधू लागले आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी देखील मागे घेतलेलं पाऊल स्पष्ट करत सांगितले, “जर भारत सीमावर्ती कारवाई थांबवतो, तर आम्हीही तणाव न वाढवण्याचा विचार करू.”