मुंबई : राज्यातील महिलांचे आर्थिक सशक्तीकरण व्हावं यासाठी तत्कालीन शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजेनच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये राज्य सरकार कडून दिले जातात. या योजनेमुळे महिलावर्गात आनंदाचे वातावरण असून या आनंदात आता आणखी भर पडणार आहे. आता लाडक्या बहिणींना ४० हजारांपर्यंत कर्ज मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे.
नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी लाडक्या बहिणींना हि खुशखबर दिली आहे. अजित पवार म्हणाले, लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. एखाद्या महिन्यात हप्ता मिळण्यास उशीर झाला तर विरोधक अफवा पसरवतात. लाडक्या बहिणींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट आता आम्ही एक नवीन प्रस्ताव समोर आणलेला आहे, काही बँका पुढं आणलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी बोलणार आहे. काही सहकारी बँका खूप चांगल्या आहेत. योजनेचे दरमहा 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात. त्याऐवजी लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य द्यायचे आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल.
महिलांना उद्योगासाठी 30 ते 40 हजार रुपये उपलब्ध करुन देण्याचा विचार
या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार बँकांसोबत चर्चा करुणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून 30 ते 40 हजार रुपये उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे. ज्या बहिणींना उद्याोग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्याोगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ज्या महिलांना व्यवसाय सुरु करू वाटतोय त्या महिला या पैशातून व्यवसाय सुरु करू शकतात. त्याच्यातून तिचं कुटुंब ती उभं करु शकेल. हे होऊ शकतं, महाराष्ट्रात काही बहिणींनी हे केलं आहे. तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महिलांच्या बँक खात्यात 10 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे.