पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील शहराध्यक्षांनीच तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातील स्थानिक राजकारणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे नाव चर्चेत आहे. समाजातील काही लोकांकडून राजकीय बदनामी केली जात असल्याचे म्हणत दीपक मानकर यांनी पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर एक पत्र देखील लिहिले आहे.
दीपक मानकर यांच्यावर पोलिसांमध्ये खोटे पुरावे सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बनावट दस्त सादर करून आर्थिक व्यवहार कायदेशीर असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवला आहे. यानंतर दीपक मानकर यांनी पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी तक्रार दिली. त्यानूसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३६ (२), ३३८, ३४० (२), ३(५) नुसार गुन्हा नोंद केला आहे. मात्र हा गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये माझ्या राजकीय आलेख पाहता आणि पक्षाची मजबूत स्थिती पाहता बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने राजीनामा दिल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाले दीपक मानकर?
काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे. मी काही वर्षापूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता 3-4 दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणाऱ्या महानगपालिका निवडणूक तसेच माझे राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही. या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा, असे म्हणत दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलीस शंतनू कुकडेवर दाखल असलेल्या लैंगिक अत्याचाऱ्याच्या गुन्ह्यांचा तपास करत आहेत. कुकडे ‘रेड हाऊस फाउंडेशन’ नावाची संस्था चालवितात. कुकडेच्या संस्थेच्या बँक खात्यातून ७ सप्टेंबर २०२४ ते २९ ऑक्टोबर २०२४ या काळात मानकर यांच्या बँक खात्यावर १ कोटी १८ लाख रुपये ट्रान्सफर झाले. या व्यवहाराच्या चौकशीत मानकर यांनी ‘हा आर्थिक व्यवहार आगळंबे (ता. हवेली) येथील जमीन विक्रीतून झाला आहे, असे सांगितले होते. तर जैन याच्याशी ५ कोटी ५१ लाख रुपयांचा करार झाल्याचे सांगत त्याची विसारपावती पोलिसांना सादर केली. मात्र, संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे पोलीस तपासात दिसून आले.
स्टॅम्प पेपरचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी रौनक जैनकडे विचारणा केली. त्यावेळी ‘दीपक मानकर यांनी मला त्यांच्या घरी बोलावून त्या स्टॅम्प पेपरवर सही करण्यास सांगितले. त्यामुळे मी सही केली,’ असे जैनने कबुल केल्याचे समर्थ पोलिसांनी म्हंटले आहे. जैनची कबुली व अधिकृत रजिस्टर, सह दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदी याआधारे मानकर यांनी सादर केलेला दस्त पूर्णतः बनावट असल्याचे निष्पन्न झाले, असे वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी म्हटले आहे.