सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कुंडमळ्याजवळील पूल कोसळला
  • २०/२५ जण वाहून गेल्याची भिती
  • पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला
 जिल्हा

माणुसकीचं अनोखं उदाहरण! आजोबांचं आजीवरचं प्रेम अन् दुकानदारही बनला दिलदार.. आनंदाच्या अश्रूंनी भरले वृद्ध दाम्पत्याचे डोळे

डिजिटल पुणे    17-06-2025 18:45:23

जालना : सध्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रसिद्ध ज्वेलर्स दुकानातील घडलेली ही घटना सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे. एका वृद्ध दाम्पत्याने प्रेमाने घेतलेली भेट आणि दुकानदाराने दिलेले माणुसकीचं उदाहरण अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहे.विशेष म्हणजे हे आजी-आजोबा माधुकरी मागत जीवन जगतात, त्यांचा एक मुलगा वारला असून त्याच्या आठवणीने दुकानात आजी आजोबांचे डोळे पाणावल्याचंही दुकान मालकाने यावेळी सांगितलं.

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आंभोरा जहागीर गावातील 93 वर्षीय निवृत्ती सखाराम शिंदे आणि त्यांची पत्नी शांताबाई शिंदे हे वृद्ध दाम्पत्य आपल्या आयुष्याचा शेवटचा टप्पा प्रेमाने जगत आहेत. हे दोघं छत्रपती संभाजीनगरमध्ये 'गोपिका' नावाच्या प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानात गेले होते. दुकानदाराला सुरुवातीला वाटलं की ते काही मदतीसाठी आले असावेत, पण त्याला लक्षात आलं की आजोबा आपल्या पत्नीला एक दागिना भेट देण्यासाठी आले आहेत.

"आजोबांचं वय 93... पण डोळ्यांत अजूनही आपल्या पत्नी विषयी प्रेमाचं तेज लखलखतंय. विशेष म्हणजे हे आजी-आजोबा माधुकरी मागत जीवन जगतात. आजोबाच्या मनात एक स्वप्न होतं, आपल्या पत्नीसाठी सोन्याची माळ घेण्याचं. हे स्वप्न असं काही होतं, जेव्हा हातात फारसं काही नव्हतं, पण मन मोठं होतं. तेव्हा आपल्याकडे असल नसेल ते घेऊन आजोबा पोहोचले 'वनग्राम'च्या सोन्याच्या दुकानात. या दुकानातून त्यांनी पत्नीसाठी घेतली एक छोटीशी माळ आणि मंगळसूत्रातलं डोरलं. आजोबाचं स्वप्न पूर्ण झालं, आजीच्या चेहऱ्यावरही मोठा आनंद पाहायला मिळाला आणि त्या क्षणात प्रेमाचा सोन्याहून मौल्यवान संग झाला."

ही गोष्ट आहे वयाच्या 90 च्या पलीकडच्या आजी-आजोबांची. एक प्रेमकहाणी जी काळालाही हरवू शकली नाही आणि एका सोनाराच्या माणुसकीची, जी अजूनही समाजात जिवंत आहे हे अधोरेखित करणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मन हेलावून टाकतोय, अनेकांच्या डोळ्यात पाणी आणतोय. 93 वर्षीय आजोबा आणि त्यांच्या वयोवृद्ध पत्नीच्या प्रेमाची ही व्हायरल सत्यकथा. 

दुकानदाराच्या मनाला हे दृश्य स्पर्शून गेलं. त्यामुळे त्यांनी शिंदे दाम्पत्याला त्यांच्या पसंतीचा गळ्यातील दागिना मोफत दिला. या अचानक मिळालेल्या दिलदार भेटीमुळे वृद्ध दांपत्याचे डोळे पाणावले. त्यांनी दुकानदाराचे आभार मानताच दुकानातील सर्व वातावरण भावूक झालं.''आजोबांची इच्छा होती की आजीने काहीतरी घ्यावं, पण मी कामानिमित्त बाहेर गेल्याने ते आजी-आजोबा दुकानातून बाहेर गेले. मग, आमच्या तिथल्याच दुसऱ्या शॉपमध्ये ते आले होते, तिथे त्यांनी तोपर्यंत एक दागिना खरेदी केला होता आणि मंगळसुत्राची एक वाटीही घेतली होती. आजोबांनी माल अगोदर 1100 रुपये दिले, पण कमी पडले का म्हणत पुन्हा आपल्या पिशवीतून मोठी चिल्लर काढली. पण, मी ती नको म्हटल्यावर आजीने पुन्हा 10-20 रुपयांच्या नोटा काढल्या.

मात्र, मी आजीकडचे आणि आजोबांकडचे पैसे त्यांना परत दिले. त्यानंतर, मंगळसुत्राची वाटी आजोबांच्या हाताने आजीला द्यायला लावली आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून केवळ 20 रुपये त्यांच्याकडून घेतल्याचं ज्वेलरी शॉपच्या मालकांनी सांगितले''. तसेच, प्रेम काय असतं हे आजोबांनी शिकवून दिलं, तो क्षण मला कधीच विसरता येणार नाही. त्यांचं प्रेम पाहून मी भारावून गेलो, कितीही छोटं असेल तो दागिना, पण त्यामागचं प्रेम सारं सांगून जाणार होतं. त्या आजी-आजोबांकडून मिळालेले 20 रुपये मी माझ्या गल्ल्यात ठेवले आहेत, जिथं मी मला मिळणाऱ्या काही गोष्टी ठेवतो, असेही ज्वेलरी शॉपच्या मालकांनी सांगितले.  

मुलाच्या आठवणीने डोळ्यात पाणी
आजोबा म्हणाले माझं वय 93 आणि हिचं वय 70 आहे, ह्या दोघांमधलं नातं सांगताना त्यांना त्यांच्या मुलाची आठवण झाली अन् त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कारण, त्यांचा तो मुलगा वारला होता. तर, दुसरा मुलगा दारुच पीत असतो. म्हणून, त्यांनी रागारागाने घर सोडलं होतं.  

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून या दुकानदाराच्या माणुसकीला सलाम केला जात आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, "हाच खरा भारत आहे... इथे अजूनही प्रेम आणि माणुसकी जिवंत आहे" या घटनेने जणू समाजात एक सकारात्मक ऊर्जा पसरवली असून, अशा हृदयस्पर्शी घटनाच खऱ्या अर्थाने ‘वात्सल्याचा दागिना’ ठरतात."प्रेमाचं वय नसतं आणि माणुसकीचं मोलही सोन्याने मोजता येत नाही. आजच्या वेगवान युगात अशी गोष्ट आठवण करून देते – प्रेम असावं तर असं आणि माणूस असावा तर असा!", अशी ही एका निस्वार्थी प्रेमाची व्हायरल कथा.


 Give Feedback



 जाहिराती