सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

ओबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी लक्ष्मण हाकेंचं समुद्रात जलसमाधी आंदोलन

डिजिटल पुणे    03-07-2025 17:08:03

मुंबई : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण आधीच तापलेले असताना, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेत गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन छेडले आहे. महाज्योती योजनेच्या निधीअभावी ओबीसी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे, हे कारण देत हाके यांनी थेट समुद्रात उतरून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

हाके यांच्यासह विद्यार्थी व कार्यकर्ते थेट समुद्रात उतरले. उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो! अशा घोषणांनी चौपाटी दणाणून सोडली. आंदोलनावेळी सरकारमधील ओबीसी नेते आणि मंत्र्यांचा देखील तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून हाके आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले.

हाके यांनी स्पष्टपणे सांगितले की, सारथी व बार्टीला कोट्यवधींचा निधी मंजूर होत असतानाही महाज्योती योजनेला तीन वर्षांपासून सातत्याने डावलले जात आहे. यामुळे हजारो ओबीसी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून शासनाने याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट तोफ डागली. लक्ष्मण हाके म्हणाले की, अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे ओबीसी समाज त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे. जर मुख्यमंत्री शिंदे यांनी यामध्ये हस्तक्षेप केला नाही, तर महाज्योतीच्या प्रश्नावर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल.

लक्ष्मण हाके म्हणाले की, जर अजित पवारांना अर्थखात्याच्या जबाबदाऱ्यांची जाणीव नसेल, तर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि माळेगाव तालुका अध्यक्ष म्हणूनच काम पाहावं. पैसा आणि सत्तेच्या राजकारणाचं धोरण हे पवार कुटुंबाची परंपरा आहे, असा घणाघात करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही हल्ला चढवला.


 Give Feedback



 जाहिराती