मुंबई - महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पैशांनी भरलेली एक बॅग दिसत असून स्वतः संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलताना दिसून येत आहेत. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. एवढे पैसे आले कुठून? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
विधानभवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आजकाल बरेच संजय चर्चेत येत आहेत. काल परवा संजय गायकवाड चर्चेत आले होते. त्यांनी मारहाण केली होती. आज संजय शिरसाट चर्चेत आले आहेत. जे बनियान-चड्डीवर बसले आहेत आणि तिथे बाजूला आम्ही ज्या खोक्यांच्या बद्दल बोलत होतो आधीपासून, 50 खोके एकदम ओके, त्यातला एक खोका तिथे दिसत आहे. पहिली गोष्ट तर ही आहे की एवढे सगळे पैसे आले कुठून? कोणी दिले? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
जी आयकर विभागाची नोटीस त्यांना आली, त्यावर काय कारवाई केली जाणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावर कारवाई होणार की नाही? एवढा व्हिडिओ समोर आला आणि त्यांना माहीत नाही म्हणतात, ते कोणत्या नशेत होते? याचा देखील तपास झाला पाहिजे. मुख्यमंत्री यांचा राजीनामा नाही घेऊ शकत का? नोट बंदीनंतर सांगण्यात आले होते की 2 लाखांच्यावर कोणी कॅश नाही ठेऊ शकत. मग एवढे पैसे आले कुठून? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
व्हिडिओ समोर आल्यावर देखील संजय शिरसाट यांनी पैसे असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, हा त्यांचा सत्तेचा माज आहे. त्यानं वाटत आहे की भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावर त्यांना या देशात कोणी हात नाही लाऊ शकत.