पुणे : "सर्जनशील व्यक्तीच्या भावना व्यक्त करण्याच्या अनेक वाटा असतात. शि. द. फडणीस यांनी व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून शब्दविरहित संवादाचा मोठा पट मांडला असून शि. द. हे व्यंग्यचित्र क्षेत्रातील तपस्वी व्यक्तिमत्त्व आहेत," असे गौरवोद्गार ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांनी रविवारी काढले.
ज्येष्ठ हास्य व व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस हे येत्या मंगळवारी (ता. २९) वयाची शंभर वर्षे पूर्ण करीत आहेत. यानिमित्त वसुंधरा क्लब व कार्टूनिस्ट्स कम्बाइन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि 'सुहाना मसाले' यांच्यातर्फे आयोजित 'शि. द. १००' या तीनदिवसीय महोत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली. महोत्सवानिमित्त भरवण्यात आलेल्या 'हसरी गॅलरी' या व्यंग्यचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन रामपुरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महोत्सवाचे निमंत्रक व 'सुहाना व प्रवीण मसालेवाले ग्रुप चे अध्यक्ष राजकुमार चोरडिया महोत्सवाचे स्वागताध्यक्ष व कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, महोत्सवाचे संयोजक वरिंद्र चित्राव, चारुहास पंडित आदी उपस्थित होते.
चारुहास पंडित यांनी काढलेल्या शि. द. फडणीस यांच्या व्यंग्यचित्राचे अनावरण करून प्रदर्शनाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन झाले. महाराष्ट्रभरातील व्यंग्यचित्रकारांनी 'शिदं'ना समर्पित केलेल्या व्यंग्यचित्रांसह 'शिदं'च्या गाजलेल्या अर्कचित्रांचा समावेश या प्रदर्शनात आहे. यावेळी 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' हा महाराष्ट्रातील जुन्या-नव्या व्यंग्यचित्रकारांची, त्यांच्या रेषा, शैली, विनोदातून नवी ओळख करून देणारा दृक-श्राव्य कार्यक्रम ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी सादर केला. कार्टूनिस्ट्स कम्बाइनचे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी सूत्रसंचालन केले.