मुंबई : सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेच्या (एनसीएसएम) अंतर्गत येणारी एक प्रमुख विज्ञान संप्रेषण संस्था, नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई (एनएससीएम) 30 जुलै 2025 रोजी वासिंद येथील जिंदाल विद्या मंदिर येथे 'आरोग्यविज्ञान आणि स्वच्छता' या महत्त्वपूर्ण संकल्पनेवर आधारित एका नवीन फिरत्या विज्ञान प्रदर्शनाच्या (एमएसई) बसचे उद्घाटन करणार आहे.
हे फिरते विज्ञान प्रदर्शन एनसीएसएमच्या "रिचिंग द अनरिच्ड” म्हणजेच वंचितांपर्यत पोहोचणे या महत्त्वाकांक्षी संकल्पनेअंतर्गत एक उत्साही संपर्क उपक्रम आहे, जो विज्ञानाला संस्थात्मक सीमांच्या पलीकडे आणि थेट ग्रामीण समुदायांमध्ये घेऊन जाण्यासाठी आरेखित केला आहे. नव्याने विकसित केलेल्या या प्रदर्शनात वैयक्तिक स्वच्छता, रोगप्रतिकारक शक्ती, पोषण, स्वच्छ पिण्याचे पाणी, झोपेचे आरोग्यविज्ञान आणि कचरा व्यवस्थापन यासह आरोग्य आणि स्वच्छतेच्या महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करणारी 20 परस्परसंवादी सादरीकरणे आहेत.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि विज्ञान मॉडेल्स, इमर्सिव्ह ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) अनुभव, दुर्बिणी वापरून आकाश निरीक्षण सत्रे, वैज्ञानिक चित्रपट आणि "मेक अँड टेक" कार्यशाळा अशा आकर्षक स्वरूपांद्वारे 'तरुण स्वच्छता दूत' बनवण्याचा प्रयत्न करतो जिथे विद्यार्थी विज्ञान मॉडेल्स तयार करतात.
शालेय मुलांमध्ये वैयक्तिक आणि सामुदायिक स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवणे, शाळांमध्ये सुरक्षित स्वच्छता पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे, परस्परसंवादी शिक्षणाद्वारे वैज्ञानिक विचार आणि जिज्ञासा निर्माण करणे तसेच सुलभ, फिरत्या विज्ञान शिक्षणाद्वारे समुदायांना सक्षम करणे अशी या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत. नाविन्यपूर्ण, तंत्रज्ञान-सक्षम शिक्षणाद्वारे आरोग्य जागरूकता वाढवून, हा उपक्रम WASH - पाणी, स्वच्छता आणि आरोग्यविज्ञान- यावर लक्ष केंद्रित करून तसेच विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या समुदायांमध्ये कायमस्वरूपी वर्तनात्मक बदल घडवून आणून "निरोगी शरीर, निरोगी मन" या तत्त्वाला प्रोत्साहन देतो.
पुढील तीन महिन्यांत ही एमएसई बस वासिंद, साळाव, डोलवी, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमधील 45 शाळांमध्ये प्रवास करणार असून यामुळे अंदाजे 90,000 विद्यार्थी आणि शिक्षकांवर सकारात्मक परिणाम होईल आणि वंचित प्रदेशांमध्ये विज्ञान-आधारित स्वच्छता शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल.हा उपक्रम वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना, निरोगी राहणीमानाच्या सवयींना प्रोत्साहन आणि स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांना पाठिंबा देण्याच्या एनएससीएम आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या सामायिक वचनबद्धतेला पुष्टी देतो.