यवत : पुणे जिल्ह्यातील यवत परिसरात आज सकाळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून दंगलसदृश परिस्थिती उद्भवली आहे. दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही तासांतच मोठ्या संघर्षात परिवर्तित झाला. दुपारी बारानंतर गावातील आठवडे बाजार बंद करण्यात आला असून, काही असामाजिक तत्वांनी दुचाकी वाहनांना आग लावली तसेच येथील मस्जिदवरही दगडफेक करून तोडफोड केली.या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एका धार्मिक ठिकाणाच्या समोर अपमानास्पद पोस्टर लावण्यात आल्याच्या संशयावरून दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच हे वाद हिंसक वळणाला गेले आणि दुकानांवर दगडफेक, वाहनांची जाळपोळ झाली.स्थानिक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असून जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यवत परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
पोलिस निरीक्षक श्री. देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, "घटनास्थळी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल."जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत स्थानिक शाळा व महाविद्यालयांना तात्पुरत्या स्वरूपात सुट्टी जाहीर केली आहे.
सुरक्षा खबरदारी:
प्रशासनाकडून सोशल मीडियावर देखरेख वाढवण्यात आली असून अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे. सध्या यवत परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडू नये.संध्याकाळपर्यंत परिस्थिती सामान्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.