सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाती आला तर जीवे मारु, नवऱ्याच्या धमकीनंतर स्नेहाने आयुष्य संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
  • मुंबईत धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलींवर पाच जणांकडून सामूहिक अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
  • महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका; राज्य सरकार, नांदणी मठ आणि वनताराची संयुक्त दाखल करणार
  • राज्यात मराठा-ओबीसी दंगली घडल्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार; मनोज जरांगेंनी सांगितला मुंबईचा प्लॅन
 जिल्हा

उरणमध्ये पहिली दिव्यांग व्हीलचेअर रेस संपन्न

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    11-08-2025 15:06:44

उरण : दिव्यांग बांधवांच्या अंगातील ताकद ही केवळ हातापायात नाही, तर ती त्यांच्या मनात, आत्म्यात, आणि जिद्दीत आहे. दिव्यांगत्व ही कमतरता नसून, ती एक वेगळी ओळख आहे, जी त्यांना इतरांपेक्षा खास बनवते.जीवनात किती वेळा पडतो हे महत्त्वाचं नाही, तर प्रत्येक वेळी उभं राहण्याची त्यांची तयारी हीच दिव्यांगांची खरी विजयकथा आहे. स्पर्धेत सहभागी होणं म्हणजे त्यांच्या मनातील तेज, कल्पना आणि विचार जगासमोर मांडणं. आणि जे लोक आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी अशक्य काहीच नसतं. सदर   व्हीलचेअर स्पर्धा ही फक्त हालचालीचं साधन नाही, तर ती दिव्यांगांच्या स्वप्नांच रथ आहे.

स्पर्धेत सहभागी होणं म्हणजे स्वतःच्या मर्यादांना आव्हान देणं आणि जगाला दाखवणं की जिद्दीपुढे कोणताही अडथळा मोठा नसतो. व्हीलचेअर रेस ही फक्त वेगाचीच नाही, तर मनाच्या धैर्याची आणि आत्मविश्वासाची परीक्षा आहे. याचेच एक उत्तम उदाहरण उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी जगासमोर ठेवले आहे. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे मागील २५ वर्षा पासुन स्पर्धा घेत आहेत. या वर्षी पहिल्यांदाच उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी '२५ व्या द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉन २०२५' मध्ये व्हीलचेर रेसिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष महादेव घरत यांच्या अध्यक्षतेखाली सदर स्पर्धा उरण तालुक्यामधील बोकडविरा - चारफाटा (एन.एम.एस.ई.झेड. मैदान), पेट्रोल पंप जवळ १०/०८/ २०२५ ला भरवण्यात आलेली होती.

सदर व्हीलचेअर स्पर्धा पहिल्यांदाच भरवण्यात आलेली होती तरीही मर्यादा ओलांडणारी चाकं उरणच्या दिव्यांग बांधवांचा अनोखा पराक्रम दाखवणारी नक्कीच ठरली. सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक - संदेश येशुदास राजगुरू,द्वितीय क्रमांक - मिल्टन ऑगस्टीन मिरंडा, तृतीय क्रमांक - गुलाम हुसेन काझी, चौथा क्रमांक -महेश पाटील आणि पाचवा क्रमांक उमेश पाटील यांनी पटकवला.भर पावसात सदर दिव्यांग व्हीलचेअर रेसिंग स्पर्धा  जोश पूर्ण वातावरणात पूर्णत्वास गेली. स्पर्धेत सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांना शाब्बासकीची थाप देण्याकरता पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांचे द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी कौतुक केले.तसेच शाबासकीची थापही दिली.पुढील येणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये प्रत्येक दिव्यांगाने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. पहिल्यांदाच उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांना द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन च्या २५  व्या 'वर्षा मॅरेथॉन' मध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल उरण दिव्यांग सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी आभार व्यक्त केले. त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनीही दिव्यांग बांधवांनी सदर स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचेही कौतुक करण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती