उरण : लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. खा. श्री. राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे उजेडात आणले आहेत. भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून, निवडणूक आयोगाच्या मदतीने, मतदार यादीमध्ये घोटाळे करून, मतचोरी करून, गैरमार्गाने सता मिळवलेली आहे. काँग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने लढा देत आहे.मतचोरी करून गैरमार्गाने सता मिळविणे हा विषय केवळ राजकीय नसून सर्वसामान्य मतदारांनी केलेल्या मतदानाचा अपमान करणारा आहे. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे करण्यात आले याची जाणीव आता सर्वसामान्य मतदारांनाही झालेली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या संदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.०० वा. देशातील सर्व जिल्हा मुख्यालयी "मतदान चोर, खुर्ची सोड" हा नारा घेऊन भव्य कॅन्डल मार्च / मशाल मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. या कॅन्डल मार्च / मशाल मोर्चामध्ये जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी, खासदार / आमदार, माजी खासदार / माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, सर्व आघाडी संघटना, विभाग व सेलचे नेतेमंडळी / पदाधिकारी यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.असे वरिष्ठांचे आदेश आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्रीमान हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार राहुलजी गांधी यांनी केलेल्या मतदार यादी पोलखोलचा भाग म्हणून व काँग्रेस पक्षाचा आदेश म्हणून गुरुवार १४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता रायगड जिल्ह्यातील मुख्यालयी अलिबाग येथे कॅन्डल मार्च आंदोलन आयोजित करण्यात आला आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ, अलिबाग येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे.तरी रायगड जिल्ह्यातील सर्व नेते, पदाधिकारी, सर्व महिला आघाडी पदाधिकारी, सर्व युवक पदाधिकारी तसेच संघटनेचे अंगीकृत पदाधिकारी,विविध सेल जिल्हाध्यक्ष,सर्व शहर/ब्लॉक अध्यक्ष, आजी माजी पदाधिकारी यांनी या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रद्धा ठाकूर यांनी केले आहे.