सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

डिजिटल आवाज - कोल्हापूर मधील महापुराचे खरे अपराधी कोण?

अजिंक्य स्वामी    2044   25-07-2021 02:12:00

२०१९ पासून आपण कोल्हापूर/सांगली या पट्ट्यामध्ये पुराचा विळखा पहात आलो आहोत. निसर्गाच्या कृपेने २०२० साल पावसाच्या दृष्टीने कोल्हापूरला चांगले गेले. मुळातच कोल्हापूर/सांगलीचा हा भाग पहिला तर मोठ मोठ्या नद्यांचा व तलावांचा प्रदेश. कोल्हापुर मधील रंकाळा, कळंबा हे तलाव तर सर्वांना परिचितच आहेत, पण कधी काळी कोल्हापूर शहरामध्ये फिरंगाई , वरुणतीर्थ, लक्षतीर्थ, कपिलतीर्थ, कुंभारतळे, महारतळे, पद्माळे, सिद्धाळा, रंकाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर, कळंबा तलाव अशी तलावे होती. पण जसजसे शहर वाढू लागले तसे ती तळी बुजवून तिथे नागरी वस्ती झाली. त्यातील आता रंकाळा, कळंबा आणि कोटीतीर्थ हे तीन तलावच आता शिल्लक आहेत. 

तलावांबरोबरच जिल्ह्यामध्ये बारमाही वाहणाऱ्या नद्यांचे प्रमाणही खूप आहे. पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती करवीर तालुक्यातल्या चिखली गावातील प्रयाग संगमापासून सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि धामणी नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते. स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. या संगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते. पंचगंगाला काळा ओढा, चंदूर ओढा, जयंती, तिळवणी ओढा, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजार आदी ओढे मिळतात. पंचगंगा नदी पूढे जाऊन नृसिंहवाडी जवळ कृष्णा नदीला मिळते. त्यामुळे शेतीच्या दृष्टीने कोल्हापूर/सांगली पट्ट्याने चांगली प्रगती केली आहे. शाहू महाराजांनी पूर्ण जिल्हा सुपीक करण्यासाठी राधानगरी सारखे आशिया मधले पहिले स्वयंचालित दरवाजे असणारे धरण बांधले. ११२ वर्षे होऊन गेली तरी या धरणाला अजिबात गळती नाही आहे. आजही हे धरण १००% भरले तरी पाणी थांबवून ठेवू शकते. गळती असती तर धरण १००% भरायच्या आधीच पाणी सोडून द्यावे लागते नाहीतर धरण फुटण्याचा धोका असतो. या धरणाने बराच भाग जलसिंचनाखाली आणला आहे.

इतकं सारं निसर्गाने भरभरून दिलेलं असताना अलीकडच्या काळामध्ये मात्र प्रत्येक पावसाळ्यामध्ये महापुराचा विळखा या दोन जिल्ह्यांना बसत आहे. हे आधी वरदान ठरले होते तेच आता शपसारखे वाटू लागले आहे. इतक्या वर्षांमध्ये कधी नव्हे ते आता होत आहे. नदीकाठच्या गावांना असणारा पुराचा धोका आपण समजू शकतो. पण नदीपासून खूप आत मध्ये असणाऱ्या शहरातील वस्त्यामधेही आता १०-१५ फुटांपर्यंत पाणी येत आहे. हे पाणी जयंती नाला वगैरे सारख्या प्रवाहांमध्ये फुग तयार झाल्याने शहरात शिरते. पण हे नदी आणि नाले आताच अस्तित्वात आले आहेत असे नाही आहे. शेकडो वर्षांपासून हे आहेत. मग अलीकडच्या दोन-चार वर्षांमधेच असे काय झाले की कोल्हापूर/सांगली पुरामध्ये बुडू लागले? २०१९ साली तर ज्यावेळी पूर आला होता त्यावर्षी पावसाळ्या आधी कोल्हापूर महानगरपलिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी लोकसहभागातून जयंती नाला, रंकाळा याची स्वच्छता करून घेतली होती. बऱ्याच ठिकाणाहून वर्षोनवर्षे साचलेला गाळ काढून रंकाळ्याला व जयंती नाल्याला मोकळा श्वास दिला होता. यामुळे २०१९ चा पावसाळा सुखकर जाण्यास काहीच हरकत नव्हती.

 

पण २०१९ च्या पाऊसाने कोल्हापूरला न भूतो असा अनुभव दिला. त्यावेळी सर्वजण या महापुराचे खापर अतिवृष्टी, आणि शेजारच्या राज्यातील अलमट्टी धरणावर फोडून रिकामे झाले. पंचागंगा नदी कृष्णेला मिळाल्यावर ही कृष्णा पुढे कर्नाटक मध्ये वाहत जाते. तिथे कोल्हापूरपासून सुमारे २०० किमी. पुढे अलमट्टी इथे एक मोठे धरण बांधलेले आहे. या धरणाने जर पाणी पुढे सोडले नाही तर त्याची फुग मागे कोल्हापूर, सांगली पर्यंत पोहोचते व वाटेतील सर्व गावे, वाड्या, वस्त्या पाण्याखाली जातात. हे जरी खरे असले तरी १००% हे एकमेव कारण नाही आहे.

पण राजकारणी लोकांनी स्थानिक लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत आपले अपयश झाकण्यासाठी पुढे केलेले कारण आहे. हे १०% पुराचे कारण असू शकते, अतिवृष्टी हेही एक कारण असू शकते. पण सर्वात मोठे कारण, अनियमित बांधकामे व भराव टाकून पाण्याचा बदलेला नैसर्गिक प्रवाह. २०२१ च्या पुराने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. यावर्षी तर राधानगरी धरणाचा एकही स्वयंचालित दरवाजा न उघडताच शहर पाण्यात बुडाले. तसेच अलमट्टीनेही यावर्षी पाणी लगेच सोडले.

जर धरणातून हे पाणी नाही सोडले तर मग आले कुठून? हे पाऊसाचे निचरा न झालेले पाणी होते. जे नदीच्या व नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहातून वाहून जाणे अपेक्षित होते. याची थोडी खोलात जाऊन माहिती घेतली असता लक्षात येते की, कोल्हापूर पन्हाळा मार्गावर जिथे पंचगंगा नदी आहे तिथे नदीपात्रानजिकच्या जमिनीवर भराव टाकून हॉटेल, फर्निचरचे दुकाने व इतर व्यवसायाची दुकाने सुरु करण्यात आली आहेत. इथे एकाने भर टाकली की दुसऱ्याच्या जागेत पाणी जाते म्हणून तोही भर टाकतो, असे बऱ्याच ठिकाणी केल्यामुळे नदीच्या पुराच्या पाण्याचा जो निचारा व्हायला पाहिजे तो योग्यरित्या होत नाही. पाणी आपली वाट शोधत दुसरीकडे घुसते. असाच प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील रुई इथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे झाला आहे. यासाठी तिथे हजारो मिटर पर्यंत भर टाकण्यात आली आहे. त्यामुळे तेथील पाणीही पुढे सरकत नाही. अजून एक महत्वाचे कारण म्हणे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग. या महामार्गाला नदी काटकोनात जाते. या महामार्गाच्या बाजूलाही अशीच भर टाकून मॉल्स, हॉटेल ई. सुरु झाले आहेत त्यामुळे नदीचे पाणी पात्रातून वाहत महामार्गाच्या पुलाखालून निचरा न होता आजूबाजूच्या भागात पसरते व जिथे महामार्ग सखल होतो तिथे पाणी महामार्गावर येऊन महामार्ग बंद पडतो. 

आता ही सर्व शास्त्रशुद्ध आणि पुराव्यानिशी असणारी कारणे बाजूला पडतात आणि दुसरेच मुद्दे चर्चेत आणले जातात. मुळातच शहराचा आणि नदीलगतच्या गावांचा विकास आराखडा तयार होत असताना याकारणांकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. यामध्ये मोठे अर्थकारण दडलेले असते. यामध्ये फायदे कोणाचे होतात हा एक स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. पण जर नुकसान पाहिले तर ते सामान्य वर्गाचेच जास्त होते. इथले राजकीय पुढारी पूर आला की पाण्यात उतरून २ तास नागरिकांना मदत करतात आणी मोठे होतात. त्यांचे बगलबच्चे लगेच या दादाने त्या साहेबाने कशी मदत केली याचे गोडवे गातात. पण कोणी कधी मूळ कारण शोधून जनतेपुढे मांडत नाही. कारण ही कारणे जर जनतेला कळाली तर त्यातील खऱ्या महापूरच्या अपराध्यांना जनता माफ करणार नाही. यात सत्ता कोणाचीही असो, २०१९ मध्ये जे विरोधक होते ते २०२१ ला सत्तेत आहेत आणि जे सत्तेत होते ते विरोधात आहेत. त्यांनी आपापले मुद्दे तयार ठेवले आहेत. पण पुरापासून शहराला वाचवायचे कसे हे मात्र कोणी सांगणार नाही आणि सत्य पुढे आणणार नाही. त्यामुळे कोल्हापूर/सांगली मधील नागरिकांनीच आता यामध्ये पूढाकार घेतला पाहिजे व प्रशासनाला प्रश्न विचारले पाहिजेत. जो पर्यंत नागरिक प्रशासनाला धारेवर धरून हे प्रश्न सोडवून घेत नाही तो पर्यंत श्रीमंत लोक भराव टाकतच जाणार आणि त्याची झळ सामान्य माणसालाच बसणार. नुसते माणसेच नाही तर पशु पक्षी, गुरे ढोरे या मुक्या जनावरांनाही याची शिक्षा भोगायला लागत आहे.

धन्यवाद!


 Give Feedback



 जाहिराती