रायगड – किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मानवंदना दिली. यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ यांना सर्वप्रथम वंदन केले. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवंद्रफडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार उदयनराजे भोसले, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री भरत गोगावले, मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
यावेळी अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मी चरित्र वाचले असल्याचे सांगत म्हटले की, अटक ते कटक पर्यंत राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्याकडे ना सैन्य होते, ना संपत्ती होती मात्र दुर्दम्य साहस त्यांच्याकडे होते. त्याच्या जोरावर त्यांनी उत्तर प्रशासन असलेले हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे आज आपला धर्म, संस्कृती वाचली आहे. त्यांनी स्वतःला आलमगिर म्हणवणाऱ्यांची इथेच कबर खोदली, असेही अमित शहा म्हणाले.
रायगड पर्यंटन स्थळ नाही तर प्रेरणास्थळ झाले पाहिजे
जिजाऊंनी बाल शिवाजींवर संस्कार केले. शिवचरित्र हे देशातील प्रत्येक मुलाला शिकवले पाहिजे. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरते सीमित ठेवू नका. त्यांचे विचार हे देशातील प्रत्येक मुलांना शिकवले पाहिजे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, भारत जगात क्रमांक एकचा देश झाला पाहिजे, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. शिवरायांच्या विचारांच्या प्रेरणेने नरेंद्र मोदी हे कार्य पुढे घेऊन जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटी ज्या काही इच्छा व्यक्त केल्या होत्यात त्यातील बऱ्याच गोष्टी मोदींनी पूर्ण केल्या आहेत. उरलेल्या बाबी पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही शहां म्हणाले.
रायगडावर पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यानी भेट दिलीच पाहिजे, त्या विद्यार्थ्यांनी इथे आलेच पाहिजे, अशी व्यवस्था येथे निर्माण केली पाहिजे. रायगड हे पर्यटनस्थळ नाही तर प्रेरणास्थळ झाले पाहिजे, असेही अमित शहा म्हणाले.
गुलामीची मानसिकता तोडण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपण स्वयंपूर्ण झालेलो असू, असा विश्वासही अमित शहांनी व्यक्त केला.शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हे आजचे आमची कॅबिनेट आहे. असा गौरोवल्लेख त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांची मुद्रा भारत सरकारच्या नौदलावर गोंदले आहे, असेही अमित शहा म्हणाले.