मुंबई : विधानसभा निवडणुकीत यंदा राज्यात सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतांचा टक्का वाढल्याचं दिसतं. अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचं चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळालं. त्यामुळे जादा झालेलं मतदान कोणाच्या पारड्यात गेलं? आणि या निवडणुकीत कोणाला धक्का बसणार? हे 23 डिसेंबरला होणाऱ्या मतदानातच स्पष्ट होईल.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.11 टक्के मतदान झालं आहे. संपूर्ण आकडेवारी हाती आल्यानंतर मतदान 68 टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं? जाणून घेऊया.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर – ७१.७३ टक्के,
अकोला – ६४.९८ टक्के,
अमरावती – ६५.५७ टक्के,
औरंगाबाद- ६८.८९ टक्के,
बीड – ६७.७९ टक्के,
भंडारा – ६९.४२ टक्के,
बुलढाणा – ७०.३२ टक्के,
चंद्रपूर- ७१.२७ टक्के,
धुळे – ६४.७० टक्के,
गडचिरोली – ७३.६८ टक्के,
गोंदिया – ६९.५३ टक्के,
हिंगोली – ७१.१० टक्के,
जळगाव – ६४.४२ टक्के,
जालना – ७२.३० टक्के,
कोल्हापूर – ७६.२५ टक्के,
लातूर – ६६.९२ टक्के,
मुंबई शहर- ५२.०७ टक्के,
मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,
नागपूर – ६०.४९ टक्के,
नांदेड – ६४.९२ टक्के,
नंदुरबार- ६९.१५ टक्के,
नाशिक – ६७.५७ टक्के,
उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,
पालघर – ६५.९५ टक्के,
परभणी – ७०.३८ टक्के,
पुणे – ६१.०५ टक्के,
रायगड – ६७.२३ टक्के,
रत्नागिरी – ६४.५५ टक्के,
सांगली – ७१.८९ टक्के,
सातारा – ७१.७१ टक्के,
सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,
सोलापूर – ६७.३६ टक्के,
ठाणे – ५६.०५ टक्के,
वर्धा – ६८.३० टक्के,
वाशिम – ६६.०१ टक्के,
यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे.
शहरी भागांत हवा तितका प्रतिसाद नाही
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी भागांमधील मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह पाहायला मिळाला. या शहरांमध्ये फक्त 50 ते 55 टक्के मतदान झालं. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्यासा फारसं यश आलं नसल्याचं दिसलं.
सर्वाधिक मतदान कोल्हापुरातील मतदारसंघात
राज्यात सर्वाधिक 82 टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात झालं आहे. तेथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) समरजितसिंह घाटगे यांच्यात चुरशीची लढत होती.
सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये
सर्वात कमी 41 टक्के मतदान हे कल्याण पश्चिम मतदारसंघात झालं आहे. त्याचप्रमाणे मुंबईच्या कुलाबा मतदारसंघात देखील सर्वात कमी मतदान झालं आहे. मंत्रालय आणि विधानभवन यासारखी सत्तेची प्रमुख केंद्रं असलेल्या कुलाबा मतदारसंघांत मतांचा टक्का वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले, तरीही तेथे 45 टक्केच मतदान झालं आहे.
लोकसभेला राज्यात 61.29 टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीत राज्यात 61.29 टक्के मतदान झालं होतं. त्या तुलनेत विधानसभेच्या मतदान टक्क्यात वाढ झाली आहे. संपूर्ण आकडेवारी हाती आल्यानंतर मतदान 68 टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
मागील विधानसभेला 61 टक्के मतदान
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 61 टक्के मतदान झालं होतं. शहरी भागांच्या ग्रामीण भागात मतदारांचा आकडा जास्त होता. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही केंद्रांवर रात्री 9 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं. त्यामुळे मतदानाची जिल्हानिहाय अंतिम आकडेवारी येण्यास विलंब लागला असला तरी मिळालेल्या आकडेवारीप्रमाणे, मतदानाने 65 ची टक्केवारी गाठली होती. यात पुढे आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
अखेरच्या टप्प्यात जोर
दुपारच्या सत्रानंतर मतदान काहीसं वाढलेलं दिसलं. संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान सर्वाधिक मतदान झालं. अंतिम आकडेवारीनुसार, मुंबईत 56 टक्के मतदान झालं. यात सर्वाधिक 62 टक्के मतदान भांडूप पश्चिम मतदारसंघात झाले असून बोरीवली आणि मुलुंडमध्येही 61 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चांदिवलीमध्ये सर्वात कमी 48 टक्के मतदान झालं आहे. वडाळा मतदारसंघात सर्वाधिक 58 टक्के, तर कुलाब्यात सर्वांत कमी 45 टक्के मतदान झालं.