सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत ३१ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

डिजिटल पुणे    28-12-2024 15:28:58

 पुणे : पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील अरणगाव तसेच धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुक्यातील लोणारवाडी येथे ३१ लाख २३ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.

विभागीय भरारी पथकाच्यावतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामधील अरणगाव गावाच्या हद्दीत श्रीगोंदा जामखेड मार्गावरील एच. पी. पेट्रोल पंपाजवळ महिंद्रा कंपनीची स्कॉर्पीओ चारचाकी वाहनामधील गोवा बनावटीचे मद्य मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर वाहनामध्ये भरत असताना छापा मारुन गोवा बनावटीच्या अॅडीरियल व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या एकूण ३२४ सिलबंद बाटल्यांचे २७ बॉक्स, दोन वाहनासह अंदाजे रक्कम १६ लाख ७२ हजार ७२० रुपये  किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. 

या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपासामध्ये धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात लोणारवाडी परिसरात भैरवनाथ मंदिराजवळ अशोक लेलॅण्ड कंपनीचा दोस्त चारचाकी वाहन व मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर या वाहनाससह अॅडरीयल व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या २१६ सिलबंद बाटल्यांचे १८ बॉक्स असा अंदाजे रक्कम  १४ लाख ५० हजार ४८० रुपये किंमतीचा मुद्देमाल रिकव्हरी पंचनाम्याखाली जप्त करुन दोन व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. 

या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील दीपक आत्माराम खेडकर, भरत शहाजी राळेभात, मनोज दत्तात्रय रायपल्ली, दत्तात्रय गंगाधर सोनवणे, धाराशिव जिल्ह्यातील शस्त्रगुण ऊर्फ शतृन नवनाथ किर्दक व कैलास आण्णा जोगदंड यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलमाअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

ही कारवाई निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली  दुय्यम निरीक्षक विराज माने व धीरज सस्ते, प्रताप कदम, सतिश पौंधे, शशिकांत भाट, रणजीत चव्हाण, अनिल थोरात, अमोल दळवी, राहुल तारळकर यांनी केली. अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यावर अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असून कोठेही अवैध दारू व्यवसाय सुरू असल्यास राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९११९८६ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती