सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

नव्या वर्षात थंडी वाढणार! तापमानात होणार मोठी घट; IMD ने दिला महत्वाचा इशारा

डिजिटल पुणे    31-12-2024 11:59:24

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. या अवकाळी पावसाचा परिणाम राज्यभरात पाहायला मिळाला, कारण ज्या भागांमध्ये पाऊस पडला नाही, त्या ठिकाणी दमट आणि आकाशात मळभ असलेले वातावरण पाहायला मिळाले. पण आता नव्या वर्षाचं स्वागत गुलाबी थंडीनं होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल तपमानात येत्या चार ते पाच दिवसात 1-2 अंशांनी वाढ होणार असून किमान तपमान 2 ते 4 अंश सेल्सियसने कमी होणार आहे. विदर्भात कमाल तपमानात फारसा बदल होणार नाही. तर किमान तपमानात येत्या 24 तासांत 4 ते 5 अंशांनी घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार आहेत. तर, येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील किमान तपमानात पुन्हा घट होणार आहे. परंतु, राज्यातील इतर जिल्ह्यांमधील तपमानाचा पारा कमी होत असला तरी मुंबईमध्ये मात्र उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण मुंबईतील तपमानाची नोंद 34 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीटही झाली. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. सध्या राज्यातील किमान व कमाल तापमानात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, राजस्थान आणि परिसरात चक्राकार वारे वाहत असून उत्तर गुजरात व आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार असल्याने अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण होते. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील थंडी कमी झाल्याचे चित्र आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती