उरण : भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर जवाहरलाल नेहरु पत्तन प्राधिकरण येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला गेला. या कार्यक्रमाला जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से., हे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या आगमनानंतर त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून या राष्ट्रीय उत्सवाची सुरुवात झाली, त्यानंतर राष्ट्रगीत झाले. मुख्य अतिर्थीनी त्यानंतर संचलनाची पाहणी केली, ज्यातून सीआयएसएफ जेएनपीए युनिटच्या शिस्तबद्धता आणि निष्ठेचे दर्शन घडले.
जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से., यांनी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात सांगितले की, "या प्रजासत्ताक दिनी, आपण आपल्या लोकशाही मूल्यांचे सामर्थ्य, एकता आणि सेवेच्या अथक भावनेचा उत्सव साजरा करत आहोत. आपल्या प्रगतीवर दृष्टी टाकण्याचा हा क्षण आहे आणि जेएनपीएमध्ये, आपण जागतिक स्तरावर भारताच्या वाढीसाठी योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहोत. अलीकडेच, आपल्याला माननीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांचे स्वागत करण्याचा मान मिळाला, ज्यांनी आपल्या पायाभूत सुविधा आणि क्षमता आणखी मजबूत करून जेएनपीए येथे अनेक परिवर्तनकारी प्रकल्पांचे उद्घाटन केले."
पुढे ते म्हणाले की, "माझ्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मी नमूद केल्याप्रमाणे, जनेप प्राधिकरण परिसरात आंतरराष्ट्रीय मानकांसह नवीन शाळेची स्थापना हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे की अलीकडेच, माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते या शाळेचा भूमीपूजन सोहळा संपन्न झाला. ही शाळा भविष्यासाठी शिक्षणाचा दीपस्तंभ म्हणून काम करेल, जी पुढच्या पिढीसाठी एक चांगले भविष्य घडवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब असेल."
18 डिसेंबर 2024 रोजी बोटीवरील प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या जनेप प्राधिकरण आणि सीआयएसएफच्या 11 कर्मचाऱ्यांचा, त्यांचे शौर्य आणि निःस्वार्थता अधोरेखित करून सत्कार करण्यात आला. त्यानंतर सीआयएसएफ जनेप प्राधिकरण पथकाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या थरारक रायफल नेमबाजीचे प्रात्यक्षिक आणि श्वान पथकाचा रोमांचक कार्यक्रम सादर केला.
राष्ट्रीय उत्सवाच्या उत्साहात भर घालत, जनेप प्राधिकरण शाळांमधील विद्यार्थ्यांनी भारताचा समृद्ध वारसा आणि विविधता अधोरेखित करणारे चैतन्यदायी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.प्राधिकरणाच्या या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याने राष्ट्रीय सेवेप्रती असलेल्या प्राधिकरणाच्या प्रतिबद्धतेला बळकटी मिळाली आणि धैर्य, सचोटी आणि समर्पण या मूल्यांसाठी समर्पित व्यक्तींच्या कार्याचा कौतुक करत सन्मान केला.