सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

शुद्ध व शाश्वत ब्रह्म स्वरूप (भाग १)

डिजिटल पुणे    17-06-2024 10:35:17

जळी स्थळी काष्ठी पाषाणी | ऐसी वदे लोकवाणी | तेणेविण रिता प्राणी | येकहि नाही ||७/४/४||
 
सातव्या दशकाचा चौथा समास विमल ब्रह्म निरुपण यात श्रीसमर्थ शुद्ध अशा ब्रह्मस्वरूपाचे वर्णन करतात. ब्रह्म आकाशासमान मलरहित, पोकळ, अवकाशमय, रूप नसलेले, अमर्याद असे विशाल आहे. २१ स्वर्ग आणि ७ पाताळ मिळून एक ब्रह्मगोळ होतो. अशा अनंत ब्रह्मगोलांना त्या निर्मळ ब्रह्माने व्यापून टाकले आहे. अशा अनंत ब्रह्मांडावर आणि खाली ब्रह्म व्यापून आहे. एक अणुमात्र जागा नाही जिथे ब्रह्म नाही. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी ब्रह्म व्यापून आहे. जलचरांना जसे आतबाहेर पाणी व्यापून असते तसे सर्व जीवांना आतबाहेर ब्रह्म अखंडपणे व्यापून आहे. तरीही पाण्याची उपमा ब्रह्माला पूर्णपणे लागू होत नाही. कारण पाण्याच्या पल्याड जमीन लागते. ब्रह्माला ओलांडून जाता येत नाही.
 
आकाशाच्या पलीकडे कोणी जाऊ म्हटला तर आकाश त्याच्या पुढेच राहील तसे अनंत ब्रह्माला शेवट नसतो. जे सतत भेटलेलेच आहे, अंगाला लिगटलेले आहे तरीही लपून आहे. अधिक निकट असल्याने त्याची जाणीव सर्वांनाच होत नाही. सर्व जीव त्या ब्रह्मात जगत असून सुद्धा याची जाणीव त्यांना नसते. त्या ब्रह्मात भ्रमामुळे जीवांना विश्वासा भास होतो. पण ज्याच्या सत्तेने तो होतो आहे त्या ब्रह्माचे आकलन होत नाही. जसे ढग आले की आकाश मलीन झाल्यासारखे दिसते. तो मलीनपणा जसा भ्रम आहे. तो आकाशाला चिकटत नाही किंवा आकाशाकडे सतत पाहत राहिले की डोळ्यासमोर चक्रे दिसतात. पण ती काही खरी नसतात त्याप्रमाणे अज्ञानी माणसाच्या अनुभवास येणारे दृश्य विश्व ज्ञानी पुरुषाला खोटेपणाने अनुभवास येते.
 
दृश्य खोटे आहे पण इंद्रियांना त्यांचा अनुभव येतो यात शंका नाही. पण ते दिसते म्हणून ते आहे असेही नाही. जसे झोपलेल्या माणसाला स्वप्न खरे वाटते आणि जागे झाल्यावर स्वप्न खरे नव्हते हे आपोआप समजते याप्रमाणे अज्ञान निद्रा मिटल्यावर, स्वरूपाचा अनुभव आल्यावर, आत्मज्ञान झाल्यावर किंवा ब्रह्मस्वरूपाला जागा झाल्यावर, त्या ज्ञानाने दृश्य हे मिथ्या आहे, सर्व दृश्य भ्रम आहे हे बरोबर समजते.
 
शुद्ध, विमल ब्रह्म विश्वात कालवलेले, पदार्थास व्यापून राहिलेले, सर्वात विस्तारीत झालेले असे आहे तरीही त्याचा हा पसारा म्हणजे त्याचा लहानसा अंश आहे. त्याही पलीकडे ते अनंतपणे उरते. विश्वाच्या बाहेर ते किती आहे याचे मोजमाप अशक्य आहे. अमृती म्हणजे देवाचे तीर्थ ठेवण्याच्या छोट्या चंबूत सगळे आकाश साठवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे तसे विश्वात संपूर्ण ब्रह्म सामावू शकत नाही. केवळ विश्वात ब्रह्माचा एक अंश व्यापून आहे असे म्हणावे लागते. असे सर्व पदार्थांना व्यापून असलेले ब्रह्म स्थिर, जसेच्या जसे राहणारे, कधीही ना चळणारे, न हलणारे आणि सर्वात असे घट्टपणे साचलेले आहे की ते हलणे शक्य नाही. पंचभूतात व्यापलेले असूनही पंचभूतातीत आहे. वेगळेपणाने राहिले आहे. जसे चिखलातील पाण्यात आकाश दिसते म्हणून ते त्याला चिकटलेले नसते. अलिप्त असते.
 
ब्रह्मास दृष्टांत न घडे | बुझावया देणे घडे | परी दृष्टांती साहित्य पडे | विचारिता आकाश ||७/४/२१||
 
कितीही दृष्टांत देऊन सांगायला गेले तरी सर्व अपुरे पडतात. तरीही थोडी कल्पना यावी म्हणून दृश्य विश्वातील दृष्टांत द्यावा लागतो. वाङ्गमयाचा आधार घेऊन आकाशाचा दृष्टांत देऊन बोलावे लागते. खं ब्रह्म म्हणजे आकाश ब्रह्म असे श्रुती म्हणजे वेद-उपनिषदे सांगतात तर गगनसदृशं ब्रह्म असे स्मृती म्हणजे पुराणे, इतर वेदांग बोलतात. या दोन्ही ग्रंथांनी आकाशाचे उदाहरण दिले आहे.
 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती