सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

ना धड संसार ना धड परमार्थ (भाग २)

डिजिटल पुणे    22-07-2024 10:33:55

ना धड संसार ना धड परमार्थ (भाग २)
 
मीपणापासून सुटला | तोचि येक मुक्त जाला | मुका अथवा बोलला | तरी तो मुक्त ||७/६/५४||
 
ज्याचा मीपणा सुटला तोच एक मुक्त झाला असे समजावे मग त्याने मौन ठेवले काय किंवा संभाषण केले काय तो मुक्तच असतो.
 
या विश्वात प्रल्हाद-नारदांपासून ते चमस-करभाजन इ. नऊ नारायणापर्यंत आणि ब्रह्मा-विष्णू-महेश ते विदेह जनकादि पर्यंत असंख्य भगवद्भक्त मुक्त झालेले आहेत आणि यावर जो विश्वास ठेवत नाही तो पढतमूर्ख समजावा. शिष्य तरीही विचारतो की मग वेदांचे वचन खोटे कसे मानावे ? यावर समर्थ म्हणतात की वेदांनी सहजच पूर्वपक्ष मांडला आहे. मूर्ख माणूस तेवढेच खरे मानून चालतो. दुसरी बाजू समजून घेणेही आवश्यक आहे. असे एकतर्फी वचन खरे मानले तर वेदांचे सामर्थ्य नाहीसे होईल. वेदांच्या ठायी जीवाला अज्ञानातून मुक्त करण्याचे सामर्थ्य नसेल तर वेदांना कोण विचारेल ? पण वस्तुस्थिती तशी नाही. वेदपुराणाच्या श्रवणाने म्हणजे एक श्लोक, अर्धा श्लोक, एक भाग एवढ्या श्रवणाने देखील पुण्य घडते. मनुष्य पवित्र होतो. दोष नाहीसे होतात. केवळ शुकवामदेवच मुक्त झाले असेच केवळ वेद म्हणत असतील तर त्यांचा महिमा राहणार नाही. असो ! चतुर लोक संपूर्ण वेद महिमा जाणतात. इतरांना तो गोंधळच वाटेल.
 
महत्वाचा मुद्दा हा आहे की मुक्त पुरुषाला त्याच्या देहाच्या अवस्थेवरून पाहायचे नसते. ते जगात देहाने वावरतात पण ब्रह्माशी असलेले तादात्म्य ढळू देत नाहीत. शुकवामदेवासहित असंख्य ज्ञानी अशा स्थितीत असतात. ब्रह्मस्वरूप झाल्यावर जो लाकडासारखा पडून राहतो त्यालाच मुक्त म्हणावे असे समजणे अयोग्य आहे. शुक मुक्त झाले म्हणून ते लाकडासारखे निर्जीव, कर्मरहित असे ब्रह्मस्वरूप होते असे नव्हे. असे असते तर त्यांनी आत्मनात्मविवेक बोलला नसता. त्यांनी परिक्षितीला एवढे भागवत उगाच का सांगितले ! आत्मस्वरूपाचे वर्णन करताना ज्ञानी पुरुषाला सारासार विचार करावा लागतो, तो शब्दांनी बोलावा लागतो. विषय समजून सांगताना चराचर विश्व शोधून योग्य दृष्टांत द्यावा लागतो. क्षणभरासाठी त्यास ब्रह्माकार व्हावे लागते. क्षणभर दृश्य विश्व तो शोधतो आणि आपले संभाषण अनेक योग्य दृष्टांतानी सुंदर बनवतो. शुकांनी एवढा सुंदर भागवत ग्रंथ सांगितला म्हणून त्यांच्या ठिकाणी बद्धपणा चिकटवता येईल काय ?
 
सारांश काय तर लाकडासारखे निचेष्ट पडून न राहता चालता-बोलता, व्यवहार करता सद्गुरुंनी केलेल्या बोधाने सायुज्यमुक्ति मिळते. कोणी मुक्त असतात तर कोणी नित्यमुक्त, कोणी जीवन्मुक्त असतात तर कोणी विदेह मुक्त असतात. सांख्यात विदेहमुक्त आणि जीवनमुक्त असा भेद आढळतो.
 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती